औराद शहाजानीत ढगफुटी, ९० मिनिटांत ९४ मिमी एवढा पाऊस
By admin | Published: June 22, 2016 09:57 PM2016-06-22T21:57:42+5:302016-06-22T21:57:42+5:30
सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर बुधवारी औराद शहाजानी परिसरावर मान्सून प्रसन्न झाला.
ऑनलाइन लोकमत
लातूर/औराद शहाजानी, दि. 22 - सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर बुधवारी औराद शहाजानी परिसरावर मान्सून प्रसन्न झाला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जवळपास ९० मिनिटांत तब्बल ९४ मि.मी. पाऊस कोसळला. या ढगफुटीने शहरासह परिसरातील गावातही पाणी पाणी करून टाकले. या पावसाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला.
बसस्थानकाचा दोन एकर आणि आजूबाजूचा दोन एकर अशा चार एकरांत जवळपास ५ फूट पाणी साचले. बाजारपेठेत पाणी घुसले. शेकडो घरांमध्ये पाणी-पाणी झाले. प्राथमिक आरोग्य केंद्रातही पाणी शिरल्याने रूग्णांचे हाल झाले. मुख्य रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी वाहू लागल्याने सर्वच वाहतूक दोन तास विस्कळीत झाली. परिसरातील शेतातही पाणी साचले असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. या ढगफुटीनंतर तगरखेडा येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याची तीन दारे अर्ध्या मीटरने उघडून हे पाणी कर्नाटकात सोडण्यात आले आहे.
औरादसह तगरखेडा, वांजरखेडा, शेळगी, सावरी, मानेजवळगा, बोटमाळ, ताडमुगळी या परिसरातही या पावसाने पाणी-पाणी करून टाकले. विजांच्या कडकडाटात ही जोरदार बरसात झाली.
शेकडो एकराचे बांध फुटले
पावसाच्या या थैमानात औराद शहाजानीच्या पंधरा किलोमीटर परिसरातील शेकडो एकर शेताचे बांध वाहून गेले. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, बांध वाहून गेल्याने दोन शेतकऱ्यांची शेती एका वावरात परावर्तीत झाली. पंधरा किलोमीटरच्या परिसरातील सर्वच शेतांनी बघावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते.
आतापर्यंत २०० मि.मी. पाऊस
औराद शहाजानी हवामान केंद्रात झालेल्या नोंदीनुसार ९० मिनिटांत ९४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यापूर्वी या परिसरात सव्वाशे मि.मी. पावसाची नोंद झाली होती. बुधवारचा पाऊस ग्रहीत धरला तर आतापर्यंत सव्वादोनशे मि.मी. पावसाची नोंद परिसरात झाली आहे. गेल्या २५ वर्षांत जून महिन्याच्या कालावधीत झालेली ही विक्रमी नोंद असल्याचे औराद हवामान केंद्राचे मोजमापक मुकर्रम नाईकवाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.