राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देणार का? गृहमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत थेटच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:46 PM2022-04-26T12:46:52+5:302022-04-26T12:54:25+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या १ मेच्या सभेच्या परवानगीवर गृहमंत्री स्पष्टच बोलले
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये होणारी सभा चर्चेचा विषय ठरत आहे. या सभेला परवानगी दिली जाऊ नये अशी भूमिका जवळपास १३ राजकीय संघटनांनी घेतली आहे. त्यातच आता औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज यांची सभा होणार का याकडे लक्ष लागलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल. औरंगाबाद पोलीस आयुक्त तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. सभेला परवानगी द्यायची की नाही ते पोलीस आयुक्त ठरवतील. राज्य सरकार ठरवणार नाही, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.
राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी स्थिती राज्यात नाही
राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. मात्र सत्ता न मिळाल्यानं काही जणांकडून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे, राज्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जात आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली नाही, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.