औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता द्विपदरीच!

By Admin | Published: April 20, 2017 05:22 AM2017-04-20T05:22:28+5:302017-04-20T05:22:28+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या प्लॅनमधील बहुतांश रस्ते दोन ते तीन पदरी करण्यात येणार आहेत

Aurangabad to Ajantha road crossing the double! | औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता द्विपदरीच!

औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता द्विपदरीच!

googlenewsNext

tyle="text-align: justify;">विकास राऊत , औरंगाबाद
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या प्लॅनमधील बहुतांश रस्ते दोन ते तीन पदरी करण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या अशा औरंगाबाद ते अजिंठ्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाऐवजी द्विपदरीकरण करण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते काम वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चीनचे उपराष्ट्रपती २०१५मध्ये अजिंठा लेण्यांना भेटीसाठी आले असता औरंगाबाद ते अजिंठा या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी आणि खड्ड्यांमुळे त्यांनी बांधकाम विभागाचे वाभाडे काढले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विभागाची बदनामी झाल्यावर तत्कालीन अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी यांनी १० नोव्हेंबर २०१५ रोजी त्या रस्त्याची जळगावपर्यंत पाहणी करून लागलीच २५ कोटींच्या डागडुजीची घोषणा केली. डिसेंबर २०१५मध्ये ते काम सुरू झाले; पण अजून ते पूर्ण झालेले नाही.
यादरम्यान नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या पॅकेजमध्ये औरंगाबाद ते सिल्लोडमार्गे अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते बोधवड मुक्ताईनगर ते पिंप्रीमार्गे बऱ्हाणपूर ते इंदौर या रस्त्यासाठी ४ हजार १० कोटी रुपयांची तरतूद असल्याचे समोर आले. दीड वर्षात या ४०१ कि़मी. रस्त्याचे दोन टप्प्यांत वर्गीकरण करून अर्धे काम बांधकाम विभागाकडे आणि अर्धे काम रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग केले. मुळात हा नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आणि आता तो द्विपदरी करण्यावर भर देण्यात आला आहे.

चौपदरी रस्ता करण्यासाठी १४ मीटर रुंदी लागते. आता होऊ घातलेले रस्ते १० मीटरमध्ये तीन किंवा द्विपदरी असतील. हा नवीन फंडा शोधून काढण्यात आला आहे. या रस्त्यांची कामे झाली तरी ते अपघाताला आमंत्रण देणारेच असतील. टेेंडर एका संस्थेने आणि डीपीआर एका संस्थेने तयार केल्याने या कामांचे काय होणार हे सांगणे अवघड असल्याचे पीडब्ल्यूडीच्या सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्यांनी लोकमतला सांगितले.

६ लाख पर्यटक अजिंठ्याला भेट देतात
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे औरंगाबादमार्गे दरवर्षी अंदाजे ६ लाख पर्यटक भेट देतात.सार्वजनिक वाहतूक व खासगी वाहनांसह अजिंठा लेणीपर्यंत रोज किमान १० हजार वाहने या रस्त्यावर असणे शक्य आहे. परंतु बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीने केलेल्या पाहणीनुसार १० हजार वाहनांपेक्षा कमी वाहतूक असल्याने हा रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्याचा निर्णय झाला आहे. दोन तासांत औरंगाबादपासून अजिंठ्यापर्यंतचे ९० कि़मी.चे अंतर पार करण्यासाठी रस्ता चौपदरी होणे आवश्यक आहे.

वेरूळ-अजिंठा लेण्यांमुळे जळगाव रोडचे चौपदरी होणे गरजेचे होते. याशिवाय वैजापूर, शिर्डी तसेच मंठा, जिंतूर, वाटूर फाट्यापर्यंतचा रस्ता चौपदरी होणे आवश्यक आहे. हे रस्ते झाले तरी मराठवाड्याच्या पर्यटन आणि इतर दळणवळणाला थोडा लाभ होईल.

Web Title: Aurangabad to Ajantha road crossing the double!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.