औरंगाबाद खंडपीठाची आंध्र पोलिसांना नोटीस
By admin | Published: December 2, 2015 01:51 AM2015-12-02T01:51:59+5:302015-12-02T01:51:59+5:30
चोरीच्या प्रकरणातील सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून विजयवाडा (आंध्र प्रदेश) पोलिसांनी उस्मानाबादच्या दोन सराफा व्यावसायिकांना बेकायदेशीरपणे पोलीस कोठडीत डांबून ठेवले
औरंगाबाद : चोरीच्या प्रकरणातील सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून विजयवाडा (आंध्र प्रदेश) पोलिसांनी उस्मानाबादच्या दोन सराफा व्यावसायिकांना बेकायदेशीरपणे पोलीस कोठडीत डांबून ठेवले. या प्रकरणात दाखल झालेल्या ‘हेबियस कॉर्पस’ याचिकेवरील सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी गृहसचिवांसह विजयवाडा पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
याचिकेत म्हटल्यानुसार परंडा (जि. उस्मानाबाद) येथील सराफ अनिल पेडगावकर व हिरालाल पेडगावकर यांच्याकडे ६ नोव्हेंबर २०१५ रोजी दोन जीपमधून विजयवाडा येथील पोलीस आले. त्यांनी दोन्ही व्यापाऱ्यांना जबरदस्तीने वाहनात कोंबले. त्यांना कुठे नेत आहोत, याची काहीही माहिती दिली नाही. ६ ते २२ नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटकही दाखवली नाही. त्यामुळे शोभाबाई हिरालाल पेडगावकर यांनी परंडा पोलीस निरीक्षक, उस्मानाबाद पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दिली होती. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी चौकशी करण्याचे तोंडी आदेश दिले. कारवाई झाली नाही. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली.
या प्रकरणात खंडपीठाने प्रतिवादी गृहसचिव, उस्मानाबाद पोलीस अधीक्षक, परंडा पोलीस निरीक्षक, विजयवाडा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.