औरंगाबाद बायपासचा तिढा सुटला
By admin | Published: July 20, 2015 12:48 AM2015-07-20T00:48:32+5:302015-07-20T00:48:32+5:30
साडेचारशे किलोमीटर लांबीच्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद बायपाससाठी ‘वाल्मी’ने आपली ७.६ हेक्टर जमीन देण्यास मान्यता दर्शविल्याने
औरंगाबाद : साडेचारशे किलोमीटर लांबीच्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद बायपाससाठी ‘वाल्मी’ने आपली ७.६ हेक्टर जमीन देण्यास मान्यता दर्शविल्याने बायपासचा तिढा सुटला आहे.
औरंगाबादला वळसा घेऊन जाणारा बायपास ५२.५० कि.मी.चा असणार आहे. त्यासाठी २०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. मार्च २०१६ पर्यंत महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.
महामार्गासाठी ‘वॉटर अॅण्ड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’ची (वाल्मी) ९.६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार होती. महामार्ग ‘वाल्मी’ परिसरातून जाणार असल्याने संस्था दोन भागांत विभागली जाणार होती तसेच काही निवासस्थाने व ५० लहान-मोठी बांधकामे, अशी १६६ बांधकामे पाडावी लागणार होती. त्यामुळे ‘वाल्मी’ने जागा देण्यास विरोध केला होता. त्यामुळे तीन वर्षे महामार्गाचे काम रखडले. अखेर २६ जुनला विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होऊन ‘वाल्मी’ने ७.६ हेक्टर जमीन सोडण्यास मान्यता दिली.
बायपासचे तीन भाग करण्यात आले. औरंगाबाद बायपास- निपाणी ते माळीवाडा हा ३४.२०० कि.मी.चा असणार आहे. दौलताबाद बायपास- माळीवाडा ते कसाबखेडापर्यंत १० कि.मी.चा व वेरूळ बायपास- कसाबखेडा ते वेरूळ हा ७.८०० कि.मी.चा असणार आहे. (प्रतिनिधी)