बारावीच्या फेरपरीक्षेत औरंगाबाद विभाग राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:47 PM2017-08-21T17:47:09+5:302017-08-21T17:53:19+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेर परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळाने राज्यात अव्वल राहण्याची यंदा हॅटट्रीक साधली आहे.
औरंगाबाद, दि. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेर परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळाने राज्यात अव्वल राहण्याची यंदा हॅटट्रीक साधली आहे. औरंगाबाद विभागीय मंडळांचा निकाल यंदा ३७ टक्के लागला असून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आज सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आला. विभागीय मंडळाने ११ ते २८ जुलै या कालावधीत ही परीक्षा घेतली होती.
औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमधून ७ हजार १३८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याही परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तिर्णतेचे प्रमाण १०.६३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुलांचे उत्तिर्णतेचे प्रमाण ३४.७६ टक्के, तर मुलींचे हे प्रमाण ४५.०९ टक्के एवढे आहे. या परीक्षेत उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपासून गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना २२ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येतील. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत हवी आहे, त्यांना निकालानंतर मंडळाकडे विहित नमुन्यात २२ आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येईल.
बारावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल यंदा ३० मे रोजी जाहीर झाला होता. बारावी बोर्ड परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नये म्हणून त्यांना सप्टेंबर- आॅक्टोबरऐवजी जुलैमध्येच उत्तीर्ण होण्याची संधी देण्याचा निर्णय मागील दोन वर्षांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला होता. यंदा जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेसाठी ७ हजार १३८ विद्यार्थी प्रवीष्ट झाले होते. यामध्ये विज्ञान शाखेचे १ हजार ३६२, वाणिज्य शाखेचे ६०२, कला शाखेचे ४ हजार ७०२ आणि एचएससी व्होकेशनलचे ४७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विभागाचा निकालाचा गोषवारा
जिल्हा प्रवीष्ठ विद्यार्थी उत्तिर्ण विद्यार्थी टक्केवारी
औरंगाबाद ३००५ ९७२ ३२.३५
बीड १३०५ ५७३ ४३.९१
परभणी ७१८ २६४ ३६.७७
जालना १४९८ ६०७ ४०.५२
हिंगोली ६१२ २२५ ३६.७६