औरंगाबादमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले
By Admin | Published: June 26, 2016 05:50 PM2016-06-26T17:50:49+5:302016-06-26T17:50:49+5:30
भरधाव जाणा-या मालवाहू ट्रकने रास्ता ओलांडणा-या दुचाकीस्वार तरुणांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २६ - भरधाव जाणा-या मालवाहू ट्रकने रास्ता ओलांडणा-या दुचाकीस्वार तरुणांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर सोबतचा अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. नारेगावकचरा डेपोजवळील केंब्रिज ते सावंगी बायपास रस्ता चौकात रविवारी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
शेख सिद्दीकी शेख चाँद(१९,रा.चिश्तिया कॉलनी)असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सोहेल शौकत शेख (१७,रा.सदर)हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्यास एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, शेख सिद्दीकी आणि सोहेल हे रविवारी सकाळी साडेअकरा ते पावणे बारा वाजेच्या सुमारास मोटारसायकलने (क्रमांक एमएच-२०सीबी ९१५२)नारेगावकडून पीरवाडीकडे जात होते.
त्यांची दुचाकी नारेगाव कचरा डेपोपासून पुढे पीरवाडीकडे जाण्यासाठी सावंगी ते केंम्ब्रिज शाळा हा वळण रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्याचवेळी सावंगीकडून भरधावपणे केंम्ब्रिज शाळेकडे टाईल्स घेऊन जाणा-या ट्रकने (क्रमांक एमएच-२०बीई ३४५७)त्यांना जोराची धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालक सिद्दीकी हा दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली आला आणि घटनास्थळीत गतप्राण झाला. या अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून ठाण्यात पळून गेला. हा अपघात घडताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.
एमआयडीसी सिडको पोलिसांनाही घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर सांगळे, पोलीस नाईक हवालदार एल.एस. कोलते यांनी घटनास्थळी जाऊन मृताचे शव घाटीत हलविले.
तर जखमी सोहेल यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत तरूण छत्रपती कॉलेजमध्ये शिकत होता. शिवाय तो सेंट्रींगचे काम करायचा. त्याचे वडिल मजूरी करतात. त्यास एक भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात ट्रकचालक रामेश्वर पांडुरंग राजाहे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.