"साहेब काल तुम्ही वर्षाहून निघाले; अहो निरोप समारंभासारखं झालं ते;" शिंदे गटातील आमदाराचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:57 PM2022-06-23T22:57:47+5:302022-06-23T23:04:15+5:30

विशेष म्हणजे, हा व्हिडिओ स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसेत त्याला कॅप्शन देत, "महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांस जाहीर पत्र लिहून तमाम शिवसैनिकांची व्यथा मांडणारे शिवसेना आमदार श्री संजय शिरसाट यांची व्हिडिओ प्रतिक्रिया....," असे लिहिले आहे.

Aurangabad MLA Sanjay shirsat commented on uddhav thackeray, you left Varsha Bungalow yesterday; it was like a farewell ceremony | "साहेब काल तुम्ही वर्षाहून निघाले; अहो निरोप समारंभासारखं झालं ते;" शिंदे गटातील आमदाराचा निशाणा

"साहेब काल तुम्ही वर्षाहून निघाले; अहो निरोप समारंभासारखं झालं ते;" शिंदे गटातील आमदाराचा निशाणा

googlenewsNext

शिवसेनेचे मातब्बल नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडाचा बिगूल फुंकून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करत, मी राजीनामा द्यायला आणि पक्षप्रमुखपदही सोडायला तयार असल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर त्यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर परतण्याचा निर्णयही घेतला. आता उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून जातानाच्या त्या प्रसंगाची खिल्ली उडवत एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर व्हिडिओच्या माध्यमातून थेट निशाणा साधला आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडिओ स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसेत त्याला कॅप्शन देत, "महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांस जाहीर पत्र लिहून तमाम शिवसैनिकांची व्यथा मांडणारे शिवसेना आमदार श्री संजय शिरसाट यांची व्हिडिओ प्रतिक्रिया....," असे लिहिले आहे.

या व्हिडिओमध्ये आमदार शिरसाट म्हणत आहेत, "उद्धव साहेब काल जेव्हा तुम्ही वर्षा बंगल्याहून निघाले, तेव्हा त्या गाडीवरचे फूलंही मी पाहिले. अहो निरोप समारंभासारखं झालं ते. येतानाचं स्वागत करायला हवं, जातानाचं नाही. माझा मुख्यमंत्री माझे पक्षप्रमुख चाललेत, ही घटना वाईट आहे. असे मी मानणाऱ्यांपैकी आहे." 

निधीसाठीही तुम्हाला किती वेळा बोललो... -
"साहेब दरवेळेला आम्ही निधीसाठीही तुम्हाला किती वेळा बोललो. तुमच्या कार्यालयातून अनेक फोन यायचे. आजही तपासून पाहा, एका एका आमदाराचे ५०-५० पत्र तेथे असतील. नाही झाली त्यावर काहीच कारवाई, नाही मिळाला आम्हाला निधी. तुमचं एक होतं, तुमचा स्वभाव आहे तो. तुमचा दोष नाहीय, की मला बदली आणि निधी बद्दल बोलू नका. कशा बद्दल बोलायचं? सांगायचे हे कामं नाहीत, तुम्ही संस्था उभ्या करा," अशी आठवणही शिरसाट यांनी ठाकरे यांना करून दिली.

आज आम्ही आमदार आहोत माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने - 
"साहेब माझ्यासारखे अनेक शिवसैनिक जे आज आमदार आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आहेत आणि त्यांच्या मुळेच आज आम्ही आमदार आहोत. पण ही निवडणूक लढवताना आम्हाला अनेक वेळा त्रास झालेला आहे. तुम्हालाही माहीत आहे, कुठे होते आपल्याकडे पैसे? आजही कुणाकडे आहेत? संस्था कशा काढायच्या? तुमची इच्छा असायची की तुम्ही मोठे व्हा, संस्था काढा. कशी काढू साहेब?" असा सवालही शिरसाट यांनी या व्हिडिओतून ठाकरे यांना गेला आहे. 

तुम्ही आम्हाला गद्दार म्हणून शकत नाही - 
शिरसाट म्हणाले, "तुम्हाला पुन्हा या माध्यमातून विनंती करणार आहे. आम्ही मार्ग दुसरा पत्करलेला नाही. आम्ही शिवसेना प्रमुखांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून वेगळे झालो आहोत. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणून शकत नाही. गद्दार आम्ही नाहीच. आम्ही शिवसेना प्रमुखांचे पाईक आहोत. त्यांनी आम्हाला शिकवण दिली आहे, जिथे अन्या होत असेल तिथे बंड करून उठा."  

म्हणून साहेब आपण आपलं घरं जाळायचं का? -
"साहेब तुमच्या बद्दलच आमचं मत वाईट नव्हतच. तुम्ही कोरोनाच्या काळात चांगलं काम केलं. तुमचे आजारपणही आम्हाला माहीत आहेत. आम्हीही देवाला साकडं घातलंना साहेब. असं काय करता. आहो हे आपलं कुटुंब आहे. पण एखाद्यावर राग व्यक्त करायचा, एखाद्यावर राग दाखवायचा, म्हणून साहेब आपण आपलं घरं जाळायचं का? कशासाठी करायचं हे?" असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकं तुम्हाला भेटत - 
जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघातली कामे करत होते. निधी मिळाल्याचे पत्र नाचवत होते. भूमीपुजन आणि उद्घाटने करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे, की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामे कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हतात, तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचे या विचाराने जीव कासावीस व्हायचा. असेही शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


 

Web Title: Aurangabad MLA Sanjay shirsat commented on uddhav thackeray, you left Varsha Bungalow yesterday; it was like a farewell ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.