औरंगाबाद मनपावर २६१ कोटींचा बोजा
By Admin | Published: September 2, 2016 07:31 PM2016-09-02T19:31:28+5:302016-09-02T19:31:28+5:30
सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढणाºया कंपनीला वर्क ऑर्डर देण्याशिवाय मनपाकडे आता कोणताच पर्याय उरलेला नाही
>- ऑनलाइन लोकमत
एलईडी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात महापालिकेची पुर्नविलोकन याचिका खारीज
औरंगाबाद, दि. 2 - शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब लावण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. महापालिकेची पुर्नविलोकन याचिका शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावली. या ऐतिहासीक तथा धक्कादायक निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर तब्बल २६१ कोटींचा बोजा पडणार हे निश्चित. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढणाºया कंपनीला वर्क ऑर्डर देण्याशिवाय मनपाकडे आता कोणताच पर्याय उरलेला नाही.
मागील सहा महिन्यांपासून मनपावर एलईडी दिव्यांचे संकट घोंघावत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केला. चार वर्षांपूर्वी मनपाने शहरातील सर्व ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी निविदा मागविली. निविदा प्रक्रियेचा वाद औरंगाबाद खंडपीठात पोहोचला. न्यायालयाने मनपाच्या बाजूने निर्णय दिला. कंत्राटदाराने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मागील काही दिवसांपासून मनपाचे अधिकारी दिल्लीच्या वाºया करीत होते. शेवटी शुक्रवारी पुन्हा मनपाचा या प्रकरणात दारूण पराभव झाला.
न्यायालयाने मनपाला बजावले की, कंत्राटदाराला त्वरीत वर्क आॅर्डर द्यावी. जाहिरात फलकाचे हक्क काढून घ्यावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मनपातील अधिकाºयांनी वर्क आॅर्डरही तयार केली असून, फक्त कंत्रादाराला ती देण्याची औपचारिकता बाकी आहे.
असा पडणार मनपावर बोजा
मनपाने ४ वर्षांपूर्वी ११२ कोटींची निविदा काढली. यामध्ये ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. हा ठेका इलेक्ट्रॉन लाईटिंग सिस्टम प्रा. लि. तथा पेरॉगॉन केबल इंडिया (जॉर्इंट व्हेंचर) या कंपनीला मिळाला. कंपनीने ९६ महिन्यांमध्ये ८६ कोटी रुपये खर्च करून ४० हजार पथदिवे लावावेत असे ठरले. यामध्ये खराब जंग्शन बॉक्स, पायाभूत सोयी-सुविधा तयार करण्यासाठी २५ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. एकूण ११२ कोटी रुपये मनपा अदा करेल. दरमहिन्याला मनपाने कंपनीला २ कोटी ७२ लाख रुपये देण्याचेही निविदा प्रक्रियेत म्हटले होते. कंत्राटदाराने आठ वर्षे प्रत्येक पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती करावी. यासाठी प्रत्येक पथदिव्यामागे मनपा ९५ रुपये देईल, असेही निविदेत म्हटले आहे. ४० हजार पथदिव्यांसाठी दरवर्षी मनपाला वेगळी रक्कम द्यावी लागले. एकूण मनपावर २६१ कोटींचा बोजा या निमित्ताने पडणार आहे.
केंद्रेकर यांचा विरोध
११२ कोटी रुपयांची निविदा केंद्रेकर यांनी चक्क ३८ कोटींवर आणली होती. मनपाने जेव्हा निविदा काढली होती, तेव्हा बाजारात एका एलईडी दिव्याची किंमत ४०० ते ५०० रुपये होती. जानेवारी २०१६ मध्ये हेच दर चक्क १५० ते २०० रुपयांपर्यंत आले. मनपाचा या निविदेमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी निविदेची चिरफाड करीत ठेका ३८ कोटींवर आणला होता. कायदेशीर बाबींमध्ये ही पद्धत तग धरू शकली नाही.