‘गुगल’वर औरंगाबादचे झाले संभाजीनगर....; आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही घेतली नामांतराची दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 06:07 AM2022-07-20T06:07:14+5:302022-07-20T06:08:00+5:30
गुगलने औरंगाबादप्रमाणेच उस्मानाबाद शहराचेही धाराशिव असे नाव अपडेट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इंटरनेटचे आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’वर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मागील २५ दिवसांत दोन वेळा शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर नामांतराचा पहिला प्रस्ताव रद्द करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरा प्रस्ताव मंजूर केला. केंद्र शासनाने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसली तरी गुगल सर्च इंजिनसह मॅपवर संभाजीनगर असे नाव दिसते आहे.
सरकारच्या निर्णयाची दखल क्रोमा या कंपनीने घेत त्यांच्या लोकेशनवर संभाजीनगर केले आहे. तर शहरातील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनीदेखील ‘संभाजीनगर’ असे लिहिण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून वादाचे वातावरण असताना गुगल मॅपवर औरंगाबादचे नाव बदलले आहे. गुगलवर औरंगाबाद टाकल्यावर तिथे औरंगाबादच्या खाली संभाजीनगर असे दिसते आहे. यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
खा. जलील यांचा गुगलला सवाल
खा. इम्तियाज जलील यांनी गुगल व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे सर्च केल्यावर दिसते आहे. हे नाव कशाच्या आधारे बदलले, असा सवाल त्यांनी ट्वीट करून विचारला आहे.
या कंपनीच्या पत्त्यावरही नाव बदलले
‘क्रोमा’ ही टाटा समूहाची उपकंपनी आहे. या कंपनीच्या लोकेशनमध्ये आता ‘औरंगाबाद’ नव्हेतर, ‘संभाजीनगर’ असे लिहून येत आहे. क्रोमा ब्राऊझरच्या पोर्टलवर गेल्यावर लोकेशनसाठी ४३१००१ ते १० पर्यंत पिन कोड टाकल्यावर संभाजीनगर दिसून येत आहे.
उस्मानाबाद सर्च केल्यास दिसते ‘धाराशिव’
उस्मानाबाद : गुगलने औरंगाबादप्रमाणेच उस्मानाबाद शहराचेही धाराशिव असे नाव अपडेट केले आहे. मॅप, वेदरमध्ये उस्मानाबाद सर्च केल्यानंतर आता उस्मानाबादसोबतच धाराशिव हे नावही दिसू लागले आहे. निजामाचा शेवटचा राजा मीर उस्मानच्या नावावरून उस्मानाबाद शहराचे नामकरण झाले होते. तत्पूर्वी या शहराचे नाव धाराशिव होते, हे जुन्या अभिलेखांवरून स्पष्ट झाले आहे. हैदराबाद स्टेटच्या गॅझेटमध्ये धाराशिव असा उल्लेख आहे. सोबतच जुन्या गाव नकाशा नोंदीवरही कसबे धाराशिव अशी नोंद आढळून येते.