औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा आज नव्याने निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 06:53 AM2022-07-16T06:53:26+5:302022-07-16T06:54:23+5:30
बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते बेकायदा होते - फडणवीस
मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय अवैध असल्याचे सांगत आता शनिवारी (दि.१६) मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचे हे दोन्ही निर्णय नव्याने घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. नवी मुंबई विमानतळास ज्येष्ठ नेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही उद्या घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते बेकायदा होते. ते उद्या न्यायालयात गेले तर टिकणार नाहीत. ही नामांतरे आमच्याही अस्मितेचाच भाग असल्याने आमचे पूर्ण बहुमतातील सरकार योग्य प्रक्रियेने हा निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमदार अब्दुल सत्तार यांनी रवींद्र नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात शुक्रवारी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिंदे यांनी टीका केली की, अडीच वर्षे सरकारने या नामांतराबाबत कोणतेही निर्णय घेतले नाहीत अन् जाताजाता अवैधरीत्या निर्णय घेतले.
फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेल्या सरकारने घेतलेले निर्णय बेकायदा ठरतात आणि न्यायालयांचे आधीचे अशा प्रकरणांबाबत निकालही आहेत. आता सुधारित प्रस्ताव तयार करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना सांगितले आहे. आमचे पूर्ण बहुमत असलेले सरकार हा निर्णय घेईल.
...तर कायमचे राजकारण सोडेन
आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकही आमदार पडला तर आपण राजकारण सोडू. आपण शिवसेनेच्या हितासाठी उठावाची जी भूमिका घेतली ती लोकांनी स्वीकारली आहे.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री