औरंगाबाद दरोड्याचा ठाण्यात लागला छडा
By admin | Published: January 12, 2015 03:20 AM2015-01-12T03:20:10+5:302015-01-12T03:20:10+5:30
नववर्षाच्या सुरुवातीलाच औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात तांबे आणि अॅल्युमिनियमचा ४ लाखांचा ऐवज लुटणा-या चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली
जितेंद्र कालेकर, ठाणे
नववर्षाच्या सुरुवातीलाच औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात तांबे आणि अॅल्युमिनियमचा ४ लाखांचा ऐवज लुटणा-या चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मुंब्य्राजवळील दहिसर मोरी येथील ‘एमके ट्रेडर्स’ हे गोदाम लुटण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना अटक केली.
रेहमान खान, प्रमोद स्वामी, रझाक शेख आणि संदीपकुमार शर्मा अशी या प्रकरणी अटक केलेल्या चौघा कथित दरोडेखोरांची नावे आहेत. चौघेही ३० ते ३५ वयोगटांतील असून, त्यातील स्वामी हा आंध्र प्रदेशचा तर उर्वरित तिघे हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. सध्या ते कल्याण परिसरात राहत होते. शीळ-डायघर भागातील ‘एमके ट्रेडर्स’ या गोदामावर दरोडा टाकण्यासाठी एक टोळी येणार असल्याची ‘टीप’ गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाचे पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांना मिळाली होती. त्यानुसार, ७ जानेवारीला पहाटे ४.३० वा.च्या सुमारास दहिसर मोरी भागातून सहायक पोलीस निरीक्षक सुनील वाघ, अशोक भंडारे, उपनिरीक्षक वसंत कांबळे, हवालदार शरद तावडे, शकील खान, गोविंद सावंत, दिनेश बनसोड आणि जयकर जाधव या पथकाने त्यांची धरपकड केली. त्यांच्याकडून कटावणी, सुरा, मिरचीची पूड आणि दोरखंडासह ४ लाखांचा ट्रकही हस्तगत केला आहे.
दरोडेखोरांची ही टोळी मोठ्या विद्युत प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या तांब्याच्या तारा आणि अॅल्युमिनियम चोरण्यात पटाईत आहे. पहाटेच्या सुमारास सुरक्षारक्षकाला बांधून माल लुटून न्यायचा, अशी या टोळक्याची दरोड्याची पद्धत होती.