औरंगाबाद ‘आरटीओ’त कोट्यवधीच्या घोटाळ्याचा संशय
By Admin | Published: June 28, 2016 03:49 AM2016-06-28T03:49:19+5:302016-06-28T03:49:19+5:30
नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रुपांतरित करताना तत्कालीन अधिकारी व एजंटनी ‘साटेलोटे’ करून कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचे उघडकीस आले
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहने नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रुपांतरित करताना तत्कालीन अधिकारी व एजंटनी ‘साटेलोटे’ करून कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईहून आलेल्या पथकाने दोन दिवस घेतलेल्या आरटीओ कार्यालयाच्या झडतीत ६०० हून अधिक वाहनांचा कर अशा प्रकारे बुडविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा घोटाळा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
२०११-१३ या कालावधीत ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रुपांतरित करताना करबुडवेगिरी करण्यात आली आहे. ट्रान्सपोर्ट संवर्गासाठी कर कमी आकारला जातो. त्यामुळे प्रारंभी ट्रान्सपोर्ट संवर्गात नोंद केल्यानंतर काही वर्षांनी वाहनाचे नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात बदल करायचा आणि चांगल्या किमतीत वाहन विकून टाकायचे, असा फंडा काहींकडून केला जात आहे.
या प्रकरणात वाहनाची किंमत कमी दाखवून ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रुपांतरित करताना भरावा लागणारा एकरकमी करदेखील कमी भरण्यात आला. यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
>२ कोटींचा महसूल बुडला
६०० पेक्षा अधिक वाहनांनी कर कमी भरल्याने २ कोटींचा महसूल बुडाल्याचा प्र्रथमदर्शनी निष्कर्ष आहे. मात्र वाहनांची संख्या पाहता हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
>परिवहन आयुक्तालयास अहवाल
मुंबईहून आलेल्या पथकाने याप्रकरणी तपासणी केली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयासही त्याचा अहवाल पाठविण्यात आला असून संबंधित वाहनांचा कर वसूल केला जाईल. -सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी