'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:09 PM2022-06-29T20:09:49+5:302022-06-29T21:16:23+5:30
'चंद्रकांत खैरैंचा मुद्दा संपला, आता त्यांनी प्रोफेशनल डान्सर व्हावं. आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही.'
औरंगाबाद: गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली.
'छत्रपती संभाजी महाराजांचा आदर नाही, राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर'-इम्तियाज जलील#Aurangabad#imtiazjalilpic.twitter.com/11hSBAxntl
— Lokmat (@lokmat) June 29, 2022
'आमच्यासाठी औरंगाबादच असेल'
''आज आमची संपूर्ण नाराजी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे. यांनी आतापर्यंत आपली सत्तेसाठी खालच्या पातळीचे राजकारण केले आहे. कॅबिनेट मीटिंगमधून दोन काँग्रेसचे मंत्री बाहेर आले होते, त्यांना थोडीही लाज असेल तर आजच राजीनामा द्यावा. अशाप्रकारचे नाटक करुन लोकांना मूर्ख बनवू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांसोबत गद्दारी केली आहे. खुर्ची वाचवण्यासाठी हा त्यांचा खेळ आहे. औरंगाबादचा एक इतिहास आहे, तुम्ही शहराचा इतिहास मिटवू शकत नाही. तुम्ही काहीही नाव ठेवा, पण आमच्यासाठी हे शहर औरंगाबादच असेल.''
'उद्धव ठाकरे तुम्ही तोंड लपवू शकत नाही'
''आज त्यांना कळालं आहे की, त्यांची सत्ता जाणार आहे. तिन पायांचे सरकार स्थापन केले आणि जाता-जाता असा निर्णय देऊन गेले. मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे की, काही दिवसांपूर्वीच तुम्ही या शहरात आला होता. तुम्ही म्हणाला होता की, आम्ही औरंगाबादचा विकास आधी करू, पाणी देऊ. पण, आता अचानक काय जादू झाली अन् नामकरणाचा निर्णय घेतला. तुम्ही आता तोंड लपवू शकत नाही, जनतेसमोर यावंच लागेल. तुमच्या नीच राजकारणामुळे शहराचे वातावरण बिघडवू शकत नाही, हे शहर आमचे आहे. तुमच्या नीच राजकारणाला आम्ही योग्य उत्तर देऊ.''
संबंधित बातमी -'या दलाल नेत्यांवर थुंका, चपलांचे हार घाला', औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक
'महाराजांवर तुमचे प्रेम नाही'
''तुमचे संभाजी महाराजांवर प्रेम नाही, त्यांचे नाव वापरुन तुम्हाला राजकारण करायचे आहे. आज हा निर्णय तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी घेतला आहे. आता हा निर्णय केंद्रात गेला आहे, केंद्र विचार करेल की, लगेच यावर निर्णय घेतला तर क्रेडीट शिवसेनेला जाणार. यांना महाराजांवर प्रेम नाही, यांना फक्त राजकारण करायचे आहे. आमच्या पक्षांनी कधीच महापुरुषांचा वापर राजकारणासाठी केला नाही, पण यांनी आजपर्यंत हेच केलं.''
'उद्धव ठाकरे औरंगाबादचा विकास करणार होते, आता काय जादू झाली?'#Aurangabad#UddhavThackeray#imtiazjalilpic.twitter.com/UnixgztcBk
— Lokmat (@lokmat) June 29, 2022
'नेत्यांच्या फोटोला चपलांचा हार घाला'
''औरंगाबादच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दलाल नेत्यांना माझं चॅलेंज आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर शहरात फिरुन दाखवा. तुमच्यात हिम्मत नाही, तुम्ही फिरू शकत नाही. तुम्ही लोकांचा विश्वासघात केला आहे. काही महिन्यानंतर निवडणुका होतील, तेव्हा यांना उत्तर मिळेलच. तोपर्यंत मी शहरातील लोकांना आवाहन करतो की, या नेत्यांच्या फोटोंवर चपलांचा हार घाला आणि सोशल मीडियावर व्हायरल करा, याच लायकीचे आहेत हे नेते. चंद्रकांत खैरैंनी आता प्रोफेशनल डान्सर व्हावं, आता त्यांचे राजकारण राहिले नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून चंद्रकांत खैरे याच मुद्द्यावरुन निवडून यायचे, आता हा मुद्दा पार पडला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय काही काम उरले नाही.''