औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं; कॅबिनेटमध्ये शिवसेना मंत्र्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:03 PM2022-06-28T19:03:24+5:302022-06-28T19:04:07+5:30
शिवसेनेने ही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्यामुळे हिंदुत्वासाठी आम्हीच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होतोय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी दबाव आणला आहे. या सर्व घडामोडीत राज्यातील सरकार अल्पमतात आले आहे. बंडखोर आमदार गुवाहाटीला आहे मात्र दुसरीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे.
राज्य सरकारच्या या कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव आणला आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घ्यावा असं परब यांनी सांगितले. अनिल परब म्हणाले की, वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना मुंबईत भूखंड द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला आहे. राजकीय विषय कॅबिनेट बैठकीत होत नाहीत. कॅबिनेटमध्ये राज्य सरकारची धोरणांवर चर्चा होते.औरंगाबाद शहराचं नामांतरण संभाजीनगर करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणावा. उद्या यावर निर्णय होऊ शकेल.
शिवसेनेने ही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्यामुळे हिंदुत्वासाठी आम्हीच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होतोय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको, भाजपासोबत युती करा अशी मागणी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांने अशाप्रकारे मागणी करून औरंगाबादचं नामांतर करण्याच्या विषयाला हात घातला आहे.
औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिलं होतं.