मुंबई ते औरंगाबाद प्रवास २० मिनिटांत, हायपरलूपच्या प्रयोगात भाग घेतोय औरंगाबादचा तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 05:59 AM2017-08-07T05:59:15+5:302017-08-07T05:59:19+5:30
सुभाषचंद्र वाघोलीकर
औरंगाबाद : कोणी औरंगाबादकर मंत्रालयात महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी डब्यात बसला, तर तो विसाव्या मिनिटाला मुंबईत पोहोचेल. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तर अवघी नऊ मिनिटे पुरेशी होतील. निघालो-निघालो म्हणेपर्यंत स्टेशनच आले, अशा शीघ्रमनोवेगाची विज्ञानपटात शोभणारी ही गोष्ट वास्तवात उतरेल, तो काळ आता फार दूर नाही. कदाचित, पुढच्या आठ-दहा वर्षांतच हे शक्य होईल!
मागील काही वर्षांत संकल्पना, आखणी व निर्मितीच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांमधून धावत आलेला हा प्रकल्प किंवा त्यातील सर्वात महत्त्वाचा गाभ्याचा घटक, आता चाचणी-प्रयोगाच्या टप्प्यावर आला आहे. हा गाभ्याचा घटक म्हणजे हायपरलूप प्रणालीमधून प्रवास करण्यासाठी वापरावयाचा पॉड म्हणजे, यान किंवा बग्गी किंवा सध्याच्या प्रचलित भाषेतील प्रवासी डबा. हे पॉड तयार करण्यासाठी जगभरच्या विज्ञान-तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले होते आणि देशोदेशीच्या शेकडो चमूंनी आपापल्या
कल्पनांना अनुसरून पॉड तयार केले. वेगवेगळ्या चाचण्यांमधून त्यातील फक्त चोवीस चमूंचे पॉड अंतिम चाचणीसाठी निवडले गेले असून, त्यात ‘हायपरलूप इंडिया’ हा भारतीय विद्यार्थ्यांचा चमू आहे. संपुर्ण आशियातून दोनच संघ अंतिम चाचणीला पोहोचले असून दुसरा संघ चिनी विद्यापीठाचा आहे. जगाची वाहतूकव्यवस्था पूर्णपणे बदलू पाहणाºया या अभिनव प्रयोगातील ‘हायपरलूप इंडिया’ टीममध्ये औरंगाबादच्या एका मराठी तरुणाचा सहभाग आहे.
या तरुणाचे नाव आहे संकेत सुशील देशपांडे. त्याचे वय आहे अवघे २१ वर्षे. सुशील आणि संगीता देशपांडे या डॉक्टर दाम्पत्याचा हा मुलगा. सध्या बिटस् पिलानी या नामांकित विज्ञान संस्थेच्या गोवा संकुलात तो शिकतो. एम.एस्सी. फिजिक्सच्या पाच वर्षांच्या कोर्समध्ये तो आता चौथ्या वर्षाला आहे. त्याचे विद्यापीठपूर्व शिक्षण केम्ब्रिज स्कूल व स. भु. महाविद्यालयात झाले. या महिन्याच्या चौथ्या आठवड्यात कॅलिफोर्नियात हॉथोर्न येथे होणाºया पॉड चाचणीत भाग घेण्यासाठी ‘हायपरलूप इंडिया’चा तीस तरुणांचा संघ जाणार आहे, त्यात संकेत असेल.
हे हायपरलूप प्रकरण काय आहे? थोडक्यात सांगायचे तर जगात सध्या प्रचलित असलेल्या वाहतूक व्यवस्थेच्या जागी कमालीची स्वस्त, स्वच्छ आणि अति वेगवान अशी व्यवस्था स्थापन करण्याचा हा प्रयत्न आहे. सध्याची मोटार, रेल्वे, विमाने वगैरे वाहतुकीची साधने तेल, गॅस यासारखी महागडी कार्बनयुक्त इंधने जाळून उद्भवणाºया शक्तीवर चालतात.
दुसरे म्हणजे ही वाहतूक साधने रस्ता, रेल्वेरूळ किंवा हवा वगैरेंच्या घर्षणाला तोंड देत धावत असल्यामुळे त्यांच्या वेगाला प्रतिरोध होतो. या दोन्ही समस्यांवर तोड दुहेरी- एक म्हणजे वाहनाला घर्षणरहित वेग देणे व दुसरे म्हणजे कर्बइंधन किंवा त्यापासून बनणारी वीज न वापरणे. पाच वर्षांपूर्वी इलॉन मूस नावाच्या तंत्रज्ञाने कल्पना मांडली की, आपण एक मोठी निर्वात नळी घेतली, तर त्यात सोडलेले प्रवासयान, त्याला हवेचा प्रतिरोध नसल्यामुळे जास्त वेगाने धावेल. ते यान निर्वात नळीच्या तळाला वा कडांनाही स्पर्श न करता, अधांतरी धावू लागले, तर घर्षण अजिबात नसल्यामुळे वेग आणखी वाढविता येईल. त्या नळीच्या बाह्य भागावर सौरपट किंवा सोलार पॅनल व आतमध्ये लोहचुंबक पक्केकेल्यास सूर्यकिरणांपासून मिळणाºया सौरऊर्जेने आतील पोकळीत इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती कार्यरत करून त्या शक्तीच्या कर्षणाने ते यान अधांतरी प्रचंड वेगाने प्रवास करील. हा वेग ताशी १०८० किलोमीटरपर्यंत नेता यावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. काहींना आशा वाटते ती थेट ताशी १२०० किमी वेगाची!
मूस यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने हॉथोर्न येथे हायपरलूपचा प्रायोगिक निर्वात किंवा जवळजवळ निर्वात असा नलिकामार्ग तयार केला असून तो दीड किलोमीटर लांबीचा आहे. याच नलिकामार्गामधून पॉड चालविण्याचा प्रत्यक्ष प्रयोग २५-२६ आॅगस्टला होईल. या वेगवान प्रवासात पॉड शाबूत राहिला पाहिजे, त्याच्यातील सर्व चलनव्यवस्था कार्यरत राहिल्या पाहिजेत, वेगाचे नियमन करता आले पाहिजे व जास्तीत जास्त वेग गाठता आला पाहिजे, हे चाचणीचे निकष राहतील. ‘आम्ही यात यशस्वी ठरु’ असा विश्वास संकेतने ‘लोकमत’जवळ बोलून दाखविला.
‘हायपरलूप इंडिया’ हे काय आणि त्यात संकेतने काय केले?
बिटस् पिलानी या उच्चविज्ञान संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी ‘हायपरलूप इंडिया’ हा गट तयार केला. हायपरलूप प्रकल्पात भारतातर्फे भाग घेणे हे त्याचे उद्दिष्ट होते. बिटस् पिलानीच्या गोवा कॅम्पसमध्ये शिकणारे संकेत देशपांडेसारखे सात विद्यार्थीही ‘हायपरलूप इंडिया’त सामील झाले.
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या बळावरच हे संशोधन सुरू केले. त्यांना त्यांच्या शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. आयआयएम बंगळुरू, आयआयएम अहमदाबाद इत्यादी इतरही संस्थांमधील विद्यार्थी नंतर वेळोवेळी सामील होत गेले. विद्यार्थ्यांकडे कल्पकता होती, तंत्रज्ञान होते. त्यांनी पॉडचे डिझाइन तयार केले. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेटालर्जी, एअरोडायनॅमिक्स इत्यादी अनेक विद्याशाखांचा समन्वय केला गेला.
डिझाइननुसार प्रत्यक्ष पॉड निर्माण करणे हे सगळ्यात कठीण काम, तेही विद्यार्थ्यांनीच केले. त्यासाठी बंगळुरूमधील प्रयोगसुविधेचा उपयोग केला. अनेकविध प्रकारचे साहित्य गोळा करणे, त्यापासून सुटे भाग घडविणे, त्यांची जुळणी करणे, सतत वेगवेगळ्या चाचण्यांमधून सुधारणा करणे, हे सगळे त्यांनी केले.
हे घडत असताना अनेक नामांकित कंपन्या व सरकारी संस्थासुद्धा आपापल्या परीने मदतीसाठी पुढे आल्या. रेल्वे व विमानवाहतूक विभाग उत्साहाने या प्रयोगाकडे पाहत आहेत. ‘हायपरलूप इंडिया’ने आपल्या पॉडला ‘ओर्का पॉड’ असे नाव दिले आहे. ‘ओर्का’ हे एका व्हेल माशाचे नाव आहे. ‘हायपरलूप इंडिया’ पॉडच्या निर्मितीत विभिन्न विद्याशाखांचे संशोधक सामील आहेत. संकेतने त्यापैकी इलेक्ट्रिकल या त्याच्या अभ्यासाच्या विभागात काम केले. ‘‘हा मोठा अनुभव होता’’ असे तो सांगतो.
‘‘अवघड आहे,
अशक्य मुळीच नाही’’
हायपरलूप यानाचा पहिला नलिकामार्ग दुबई ते अबुधाबी योजण्यात आला असून, दुसरा मार्ग स्टॉकहोम ते हेलिसिंकी असा योजला गेला आहे. एका अमेरिकी कंपनीने न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन असाही मार्ग तयार करण्यासाठी तेथील सरकारची परवानगी मिळविली, अशी बातमी नुकतीच कळली आहे. ज्या वेगाने हा विषय पुढे सरकत आहे त्यावरून पुढच्या आठ-दहा वर्षांतच पहिला हायपरलूप प्रवास सुरू होऊ शकेल.
भारतात ही प्रणाली कधी येईल, असे विचारता संकेत म्हणाला की, व्यावहारिकदृष्ट्या याचे उत्तर देणे अवघड आहे. फारच अवघड आहे. आम्ही केवळ संशोधक आहोत. याची भांडवल गुंतवणूक आपल्या देशाला परवडेल का? नेहमीचे प्रशासकीय अडथळे आपण टाळू शकू का? माहीत नाही! आता कॅलिफोर्नियाला जमणाºयांमध्ये बहुतेक संघ अमेरिका-युरोपमधील आहेत. त्यांच्याकडे साधनांची रेलचेल आहे. त्यांच्याकडील तंत्रज्ञानसुद्धा आपल्यापेक्षा प्रगत आहे. स्पर्धेत त्यांच्यासमोर टिकणे मोठे कठीण आहे; मात्र आपल्याकडेसुद्धा चांगली तांत्रिक कुवत निर्माण झाली आहे, असे मला वाटते. त्यामुळे अडचणी असल्या तरी त्यावर मात करीत ही प्रणाली राबविणे भारताला निश्चितच शक्य आहे! कॅलिफोर्नियातील कसोटीत आम्ही उतरू, असा विश्वास वाटतो.
मागील वर्षी संकेत आणि त्याच्या मित्रांनी मिळून एक स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्यांनी अंधांना ब्रेल लिपी शिकविणारे एक यंत्र तयार केले. अंधशाळेत न जाता, कोणाची मदत-मार्गदर्शन न घेता, घरबसल्या ब्रेल लिपी शिकणे त्यामुळे शक्य झाले. हे यंत्र अगदी अल्प खर्चात तयार केले असून, जगात प्रथमच अंधांचा स्वयंशिक्षक निर्माण झाला आहे. इंग्लंडचे प्रिन्स विल्यम मुंबईत आले असताना, त्यांनी या उपकरणाची प्रशंसा केली होती.