औरंगाबादकरांनी अनुभवली नेपाळ दुर्घटनेची दाहकता
By Admin | Published: April 27, 2015 02:02 AM2015-04-27T02:02:55+5:302015-04-27T02:02:55+5:30
नेपाळ व भारताला शनिवारी सकाळी प्रचंड हादरा देणाऱ्या विनाशकारी भूकंपाची दाहकता औरंगाबादेतील जैन समाजबांधवांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली.
अमिताभ श्रीवास्तव, औरंगाबाद
नेपाळ व भारताला शनिवारी सकाळी प्रचंड हादरा देणाऱ्या विनाशकारी भूकंपाची दाहकता औरंगाबादेतील जैन समाजबांधवांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली. शहरातील ५ जण आणि जामनेर (जि. जळगाव) येथील १ असे एकूण ६ भाविक नेपाळची राजधानी काठमांडूत सुरक्षित आहेत.
नेपाळहून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील व्यापारी आणि जैन समाजाचे पद्मराज सुराणा, उत्तम सुराणा, जतनराज सुराणा, लालचंद सिपानी व त्यांची पत्नी बिमलादेवी सिपानी व जामनेरचे प्रदीप कुचेरिया तेरापंथी जैनाचार्य महाश्रमणजी मसा यांच्या प्रवचनात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले होते. तेथील बालमंदिर शाळेच्या परिसरात हे प्रवचन सुरू आहे. महाराजांचे प्रवचन संपले आणि मंगलपाठानंतर ते सभागृहातून बाहेर निघत असतानाच अचानक जमिनीचा थरकाप झाला आणि क्षणार्धात सर्व मंडप उद्ध्वस्त झाला.
तेरापंथी जैन समाजाचे माजी अध्यक्ष असलेल्या पद्मराज सुराणा यांनी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांना सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार पावणेबारा वाजेच्या सुमारास महाराज सुरक्षित बाहेर पडले व जबरदस्त भूकंप येऊन मंडप उद्ध्वस्त झाला. महाराज सुरक्षित बाहेर पडले; परंतु मंडप अंगावर पडून काही भाविक किरकोळ जखमी झाले.
सुराणा म्हणाले की, औरंगाबादेतील सर्व भाविक आणि जामनेरचे त्यांचे नातेवाईक सुरक्षित आहेत. त्यांना साधे खरचटलेही नाही; परंतु ते म्हणाले, पावणेबारा वाजेपासून सुरू भूकंपाच्या धक्क्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत अधूनमधून हादरे बसत होते. शनिवारच्या प्रवचनासाठी भारतातून योगगुरू रामदेव आणि त्यांचे शिष्य बालकृष्णदेखील प्रवचनस्थळी आले होते. तेदेखील सुरक्षित मंडपातून बाहेर पडले आहेत.