औरंगाबादचा प्रणव भारतीय लष्करात होणार लेफ्टनंट
By Admin | Published: June 15, 2017 07:55 PM2017-06-15T19:55:58+5:302017-06-15T19:55:58+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागाचा विद्यार्थी प्रणव सुधाकर शेंडगे हा भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट होणार आहे.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 15 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागाचा विद्यार्थी प्रणव सुधाकर शेंडगे हा भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट होणार आहे. पदव्युत्तर पदवीस्तरावर विविध विषयांमधुन लेफ्टनंटपदासाठी घेण्यात आलेल्या खडतर चाचणीत प्रणवची निवड झाली. देशभरातुन एकुण १७५७ उमेदवारांपैकी केवळ ७ जणांची निवडण्यात आले. यात महाराष्ट्रातुन प्रणव हा एकमेव विद्यार्थी आहे.
भारतीय सैन्य दलात पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांच्या मानसशास्त्रीय चाचणी, मैदानी आणि मुलाखतीच्या खडतर चाचणीतुन लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते. या चाचणीसाठी देशभरातुन १७५७ उमेदवार निवडण्यात आले होते. या सर्व उमेदवारांनी भोपाळ, बंगळुरू आणि अलाहाबाद येथे चाचणी घेण्यात आली. प्रणव शेंडगे याने फेब्रुवारी महिन्यात भोपाळ येथे ही चाचणी दिली. याचा गुरूवारी निकाल जाहीर झाला. यात देशभरातुन केवळ ७ विद्यार्थ्यांची निवडण्यात आले. गणित विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या प्रणवचा विज्ञान गटातुन निवड झाली. ही परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रणव हा राज्यातील एकमेव विद्यार्थी आहे. प्रणव हा मुळचा गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावाचा असून, त्याचे वडिल डॉ. सुधाकर शेंडगे विद्यापीठातील हिंदी विभागात प्राध्यापक आहेत.
पदवीला पटकावले होते सुवर्णपदक-
बारावीमध्ये ८५ टक्के पडल्यानंतर अभियांत्रिकीच्या नामांकित महाविद्यालयात सहजरित्या प्रवेश मिळत असताना प्रणव याने गणित विषयाची निवड करत बी.एस्सी करण्याचा निर्णय घेतला. देवगिरी महाविद्यालयात बी.एस्सीचे शिक्षण घेत असताना तो विद्यार्थी संसदेचा सचिवही बनला. त्याच वर्षी विद्यापीठाच्या संसद मंडळाची निवडणूकीत विजय मिळवत विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेचा सचिव बनला होता. बी. एस्सीला गणित विषयात सुर्वणपदक पटकावत ९१ टक्के घेतले. यानंतर विद्यापीठातील गणित विभागातुन एम.एस्सी ७४ टक्के घेत नुकतेच पुर्ण केले आहे.
डेहराडूनला मिळणार प्रशिक्षण-
भारतीय सैन्य दलाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी त्यांना ४ जुलैपर्यंत अॅकॅडमीत दाखल व्हावे लागणार आहे.
ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. मात्र ठरलेली पायवाट सोडून बाजूचा विचार करण्याची गरज आहे. माहिती नसलेल्या रस्त्याची निवड केल्यामुळे हे यश मिळाले. या आई-वडिलांसह शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
- प्रणव शेंडगे