औरंगाबादच्या युवकाची कंपनी ‘ई-बे’ने केली खरेदी!
By Admin | Published: July 16, 2016 03:44 AM2016-07-16T03:44:33+5:302016-07-16T03:44:33+5:30
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन वयाच्या १८व्या वर्षी औरंगाबादच्या मुक्तक जोशी या तरुणाने स्थापन केलेली इव्हेन्ट तिकीट विक्री करणारी ‘टिकेट युटिल्स’ ही कंपनी ई-कॉमर्समधील
औरंगाबाद : मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन वयाच्या १८व्या वर्षी औरंगाबादच्या मुक्तक जोशी या तरुणाने स्थापन केलेली इव्हेन्ट तिकीट विक्री करणारी ‘टिकेट युटिल्स’ ही कंपनी ई-कॉमर्समधील अग्रगण्य असलेल्या अमेरिकेतील ‘ई बे’ कंपनीने खरेदी केली आहे.
मुक्तक जोशी याचे औरंगाबादेतील सरस्वती भुवन प्रशालेत मराठी
माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाले
आहे. देवगिरी महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर त्याने एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या काळातच त्याने
सॉफ्टवेअर कंपन्यांचे ‘फ्री लान्सिंग काम करण्यास सुरुवात केली. २००५मध्ये बी. ई. कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण झाला. २००७मध्ये ‘टेक्नोप्रोटेन’ कंपनी स्थापन केली. त्यानंतर २०१२मध्ये ‘टिकेट युटिल्स’ची सुरुवात केली.
मुक्तकचे बंधू सत्यक जोशी आणि पत्नी श्रुती हे त्यांना कंपनीच्या कामात मदत करतात. त्याचे वडील शोधन जोशी हे शहरातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. अमेरिकेतील लास वेगास शहरात शुक्रवारी मुक्तकच्या ‘टिकेट युटिल्स’चा ‘ई-बे’शी करार झाला. मात्र, हा करार किती किमतीला झाला याची माहिती दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केलेली नाही. (प्रतिनिधी)
अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये होणाऱ्या मोठमोठ्या स्टेडियममध्ये आणि इनडोअर ठिकाणी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि विविध इव्हेंटची तिकिटे अनेक ब्रोकर गठ्ठा पद्धतीने (बल्क) खरेदी करतात आणि नंतर ती आॅनलाइन नागरिकांना विक्री करतात.
ग्राहकांपर्यंत आॅनलाइन तिकीट पोहोचविण्यासाठी आवश्यक
असणारे सॉफ्टवेअर ‘टिकेट युटिल्स’ने तयार केले असून, काही सेकंदांत लाखो लोकांपर्यंत ही तिकिटे पोहोचण्यास मदत होत आहे. तिकिटांची पुनर्विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले ‘पॉइंट आॅफ सेल’ असे हे उत्पादन ‘टिकेट युटिल्स’ने विकसित केले आहे.
कंपनीचे हे उपयुक्त सॉफ्टवेअर
पाहून या क्षेत्रात बडी कंपनी
असलेल्या ‘ई बे’ने कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मुक्तकच्या कंपनीत औरंगाबाद, जालना, बीड आदी ठिकाणांहून आलेली तरुण मंडळी आहेत.