‘या देशात औरंगजेब हिरो होऊ शकत नाही’; स्टेट्स ठेवल्याची एसआयटी चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:16 PM2023-08-03T12:16:25+5:302023-08-03T12:17:17+5:30

भारतातला मुसलमान हा काही औरंगजेबाचा वंशज नाही. या देशात तो कोणाचा हिरो होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, कलामच हिरो होऊ शकतात, असे  फडणवीस यांनी ठणकावले.

Aurangzeb cannot be a hero in this country SIT inquiry about status says devendra fadnavis | ‘या देशात औरंगजेब हिरो होऊ शकत नाही’; स्टेट्स ठेवल्याची एसआयटी चौकशी

‘या देशात औरंगजेब हिरो होऊ शकत नाही’; स्टेट्स ठेवल्याची एसआयटी चौकशी

googlenewsNext


मुंबई : औरंगजेबाचे स्टेटस ठेवून तरुणांची माथी भडकविण्याचे काम कोणीतरी करत आहे. यामागे षङ्यंत्र आहे का यावर एटीएस, आयबीदेखील काम करत आहे. आवश्यकता भासल्यास एसआयटी चौकशीदेखील करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.  

यासंदर्भात भाजपचे नितेश राणे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की,  या देशात औरंगजेब हा कोणाचाच नेता होऊ शकत नाही. अगदी देशातील मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही. तो वंशाने टर्किक मंगोल होता. भारतातला मुसलमान हा काही औरंगजेबाचा वंशज नाही. या देशात तो कोणाचा हिरो होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, कलामच हिरो होऊ शकतात, असे  फडणवीस यांनी ठणकावले. राणे यांच्या काही विधानांवर सपाचे अबू आझमी आणि रईस शेख यांनी आक्षेप घेतला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. 

‘...मग आंबेडकरांविरुद्ध गुन्हा का नाही?’   
ॲड. प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या मजारीवर गेले होते. स्टेट्स ठेवले म्हणून गुन्हे दाखल करता मग आंबेडकरांविरुद्ध गुन्हा का नाही, असा सवाल अबू आझमी यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवावे, असे आवाहन मी आंबेडकर यांनाही केले होते. जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणे खपवून घेणार नाही. महापुरुषांचा अवमानही सहन करणार नाही. अगदी माझा सख्खा भाऊ असला तरी कारवाई करेन.  

‘आता बाबा नावाचा पुरावा आणू का?’ 
उदात्तीकरण करू नये असे आपण म्हणालात पण संभाजी भिडेंचा उल्लेख गुरुजी म्हणून करत आहात. तो माणूस गुरुजी असल्याचा काही पुरावा आहे का? तो माणूस फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक होता, असे सांगतात. तो सोने गोळा करतो. त्याचा हिशेब घेतला का, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले, त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे. आता तुम्हाला ‘पृथ्वीराज बाबा’ म्हणतात. आता ‘बाबा’ नावाचा पुरावा आणू का?

Web Title: Aurangzeb cannot be a hero in this country SIT inquiry about status says devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.