औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता! डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:24 AM2023-08-08T05:24:30+5:302023-08-08T05:24:58+5:30
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव सांगता समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दादर येथे झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेब आणि दुसरा बाजीराव यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता, त्याला इतिहासकारांनी हिंदूद्वेष्टा ठरविले, असा दावा नेमाडे यांनी केला आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव सांगता समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दादर येथे झाला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक वाजपेयी यांच्यासह डॉ. भालचंद्र नेमाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नेमाडे म्हणाले, पुस्तके वाचली की, तुम्हाला खरे काय ते कळेल. बाहेर चाललेले खोटे असते.
शिवाजी महाराजांचा विश्वासू सहकारी मुसलमान होता. शेवटपर्यंत त्यांचा विश्वास असणारा सहकारी मदारी मेहेतर होता. औरंगजेबाचा सेनापती जयसिंह ज्याने शिवाजी महाराजांना पकडून दिले तो हिंदू होता.
औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. निम्म्याहून जास्त हिंदू सरदार त्याच्या काळात वाढले; मग, तो हिंदूद्वेष्टा वगैरे होता, असे कसे म्हणता येईल? सतीप्रथा कुणी बंद केली हे विचारले की, उत्तर येते लॉर्ड बेटिंग. मात्र, सतीची प्रथा पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेबच होता, असेही नेमाडे यांनी सांगितले.
काय म्हणाले नेमाडे?
औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या. शाहजहानची आई हिंदू होती, अकबराची बायको हिंदू होती, औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आले. म्हणून त्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदूद्वेष्टा ठरवले आहे. पण, औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता.
भाजपची तक्रार
भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावर आता वादविवाद सुरू झाले आहेत. भाजपने नेमाडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती भाजप सोशल मीडियाचे कायदेशीर सल्लागार विभागाचे प्रमुख ॲड. आशुतोष दुबे यांनी ट्वीट करत दिली.