औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी केले मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 05:34 PM2023-06-17T17:34:59+5:302023-06-17T17:35:52+5:30
नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे त्यांना एकच सांगतो, औरंगजेबाने राज्य केले हे कोणाला मिटवता येणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर - राज्यात अलीकडेच औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे अनेक भागात हिंसाचार घडला. कोल्हापूरमध्ये दंगलसदृश परिस्थिती उद्भवली. मात्र याच परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटू शकते.
औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, औरंगजेबाच्या समाधीला मी भेट दिली. इथं ऐतिहासिक वास्तू आहे ती बघायला आलो आहे. औरंगजेब राज्यावर ५० वर्ष राज्य करून गेला ती तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचे राज्य इथं आले का हे बाबासाहेबांनी सांगितलंय. जयचंद इथं आले होते. त्या जयचंदाला शिव्या घाला आणि औरंगजेबाला शिव्या का घालताय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत मी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने ठाकरेंची कोंडी अजिबात होणार नाही. कारण औरंगाबाद हे दुसरी राजधानी व्हावी हे तुघलकांपासून आहे. महाराष्ट्राने पुढाकार घेऊन या भारताची दुसरी राजधानी हे औरंगाबाद, खुलताबाद करावी. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर २ दिवसांत दंगलीचा विषय निपटून टाकला असता. वादाचा विषय होऊन देता म्हणून होतो असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
देशाला गुलाम केले त्यांची निंदा करा
खुलताबाद ऐतिहासिक शहर आहे, आम्ही येथील मारुती मंदिराला देखील भेटत आहोत. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे त्यांना एकच सांगतो, औरंगजेबाने राज्य केले हे कोणाला मिटवता येणार नाही. बाबासाहेबांनी सांगितले, औरंगजेबाचे राज्य आले जयचंद यांच्यामुळे आले. असे जयचंद येथील अनेक हिंदू राज्यांकडे होते. त्यांना तुम्ही का विरोध करत नाहीत. ज्यांनी देशाला गुलाम केले त्यांची तुम्ही निंदा करा असंही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.