एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व
By Admin | Published: October 4, 2015 01:48 AM2015-10-04T01:48:11+5:302015-10-04T01:48:11+5:30
ज्येष्ठ लेखक यशवंत पाध्ये यांच्या निधनाला ३० सप्टेंबर रोजी १ वर्ष झाले. १९७२ सालापासून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख....
- मंदाकिनी भट
ज्येष्ठ लेखक यशवंत पाध्ये यांच्या निधनाला ३० सप्टेंबर रोजी १ वर्ष झाले. १९७२ सालापासून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख....
यशवंतरावांचा आणि माझा परिचय झाला १९४२मध्ये. मी लेखनिक या नात्याने काही काम आहे का या भावनेतून त्यांना पत्र लिहिले होते; आणि ८ दिवसांतच मला बोलावले गेले. आमचे जुजबी बोलणे झाले आणि कामाला सुरुवात झाली, ती अगदी शेवटचे ‘पंचायतन’ या जुलै २०१४च्या पुस्तकापर्यंत! एवढ्या अवधीत जवळजवळ सव्वा ते दीड लाख पृष्ठांचे काम मी पार पाडले. १९८०पर्यंत झेरॉक्स हा प्रकार फारसा नव्हता. त्यामुळे कधीकधी एकेका लेखाच्या पाच-पाच प्रती याप्रमाणे पन्नास पृष्ठे एका दिवसात ते माझ्याकडून लिहून घेत असत. नंतर झेरॉक्सचा जमाना आला आणि एकाच लेखाच्या अनेक प्रती लिहून घेणे बंद झाले. पण लेखांची संख्या वाढली. त्यांच्या लिखाणामुळे त्यांनी साहित्याच्या बँकेत मात्र ‘बँक बॅलन्स’ अफाट कमावला होता. शेवटचे त्यांचे पुस्तक होते पाच संतांची ओळख करून देणारे ‘पंचायतन’!
साहित्य क्षेत्रात यशवंतराव प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांना गुरूस्थानी मानत. यशवंतरावांनी आरंभी लेखन केले ते बरेचसे राजकीय, वैचारिक, चरित्रात्मक आणि मुलाखती स्वरूपातले! प्रत्येक लेख हा मागील लेखापेक्षा सरस असायचा. त्या लेखात अनेक बारकावे सहजपणे दाखवलेले असायचे! एकामागून एक जवळजवळ ४०-४५ पुस्तकांतून व्यक्तिचित्रण, राजकारण, धार्मिक, ऐतिहासिक, चिंतनात्मक, सामाजिक, बाल साहित्य असे विषय हाताळले गेले. जीवन समर्थपणे जगणारा लेखक, पत्रकार, स्तंभलेखक, समाजसेवक असा हा आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘यशवंत’ झाला. त्यांनी गर्व, मोठेपणा, अहंकार याला कधीही जवळ येऊ दिलं नाही. त्यांचे हे गुण ‘अर्थप्राप्ती’पेक्षा ‘गुणप्राप्ती’ देऊन गेले. यशवंतराव हे व्यक्तिमत्त्वच असं होतं की ते आपण विसरूच शकणार नाही.