लेखक, संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन
By admin | Published: April 21, 2017 03:02 AM2017-04-21T03:02:51+5:302017-04-21T03:02:51+5:30
दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. डॉ. रामनाथ चव्हाण (वय ६५) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.
पुणे : दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. डॉ. रामनाथ चव्हाण (वय ६५) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी शीला, मुले सागर व समीर असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. प्रा. चव्हाण यांची प्रकृती कर्करोगामुळे खालावली होती. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.
मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज...
‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’चा पहिला खंड २००२मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी डवरी, गोसावी, कंजारभाट, वैदू, कोल्हाटी, जोशी, डोंबारी, कैकाडी, वडारी, वंजारा, काकर, पारधी अशा ११ जमातींवर लिखाण केले आहे.
२००४मध्ये प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या खंडात मातंग गारुडी, काशी कापडी, सिकलीकर, रजपूत भामटा, दसनाम गोसावी, गोपाळ, टकारी, घिसाडी, छप्परबंद अशा नऊ जमातीवर तर २००६मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या खंडात नंदीबैलवाले, गाढवगोती बेलदार, रायरंद, मरीआईवाला, बहुरूपी, नाथपंथी रावळ या सहा जमातींवर लिखाण केले आहे.
२००८मध्ये प्रसिद्ध झालेल्या चौथ्या खंडात परदेशी भोई, मदारी, मसणजोगी, चित्रकथी, पाथरवट, घ्यारे कंजर, डक्कलवार अशा सात जमातीचा अभ्यास समाविष्ट असून अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पाचव्या खंडात दरवेशी, लोहार, तिरमल, बागडी, वेडूवाघरी, धनगर, गोंधळी, ओतारी आदी जमातीवर केलेला अभ्यास समाविष्ट आहे.
‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’ हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले लिखाण मराठीतील हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम्, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
प्रा. चव्हाण यांनी आपल्या साहित्यातून ठामपणे भूमिका मांडली. भटकणाऱ्या समाजाच्या वेदना साहित्यातून समाजासमोर मांडला. साहित्याच्या माध्यमातून ते कायमच आपल्याबरोबर असतील.
- रामदास आठवले
(केंद्रीय राज्यमंत्री,
सामाजिक न्याय)
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनावर कार्यरत असताना त्यांनी गावागावांत जाऊन साहित्याच्या माध्यमातून भूमिका मांडली. त्यांनी बहुमूल्यलेखन केले. त्यांनी विद्यापीठात दिलेले योगदान न विसरण्याजोगे आहे.
- डॉ. वासुदेव गाडे (कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)