शिक्षकभरती प्रक्रियेला अधिकाऱ्यांचाच ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:23 AM2019-01-29T06:23:03+5:302019-01-29T06:23:15+5:30
शिक्षण आयुक्त नाराज; अधिकाऱ्यांची अनास्था पत्रातून व्यक्त
पुणे : शिक्षकभरती प्रक्रियेला विभागातील अधिकाºयांकडूनच ‘खो’ दिला जात असल्याचे समोर आहे. या अधिकाºयांच्या अनास्थेमुळे प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत खुद्द शिक्षण आयुक्तांनीच अधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यात शिक्षकभरती प्रक्रियेसाठी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा आढावा शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडून घेतला जात आहे. त्यानुसार दि. २९ जानेवारी रोजी या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोळंकी हे अधिकाºयांशी संवाद साधणार होते. पण, या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने नाराजी व्यक्त करीत त्यांनी ही आढावा बैठक पुढे ढकलली आहे. आता व्हिडीओ कॉन्फरन्सऐवजी ते दि. १ व २ फेब्रुवारी रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व महापालिकांचे प्रशासन अधिकारी मनपा यांची बैठक पुण्यात घेणार आहेत. तत्पूर्वी, सोळंकी यांनी संबंधित सर्व अधिकाºयांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
सूचनांनंतरही होईना योग्य प्रकारे अंमलबजावणी
भरती प्रक्रियेचे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. सर्व संबंधितांना याबाबत वेळोवेळी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत; पण योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही.
गुगल फॉर्मवर नियमितपणे माहिती अद्ययावत होत नाही. भरलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
बैठकीसाठी कोणत्याही प्रतिनिधीला न पाठविता स्वत: उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचनाही अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.