‘आॅटो हब’ नागपुरातच व्हावा

By admin | Published: December 24, 2014 12:48 AM2014-12-24T00:48:19+5:302014-12-24T00:48:19+5:30

रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत

'Auto hub' should be in Nagpur | ‘आॅटो हब’ नागपुरातच व्हावा

‘आॅटो हब’ नागपुरातच व्हावा

Next

विजय दर्डा यांच्या मागणीचे समर्थन : इंटकची २८ पासून जनजागृती मोहीम
नागपूर : प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी देशभरातील आॅटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित उद्योजक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दर्डा यांच्या मागणीचे समर्थन इंटकचे संघटन सचिव राजेश निंबाळकर यांनी केले असून या मुद्यावर इंटकचे कार्यकर्ते २८ डिसेंबरपासून विशेष जनजागृती अभियान राबविणार आहेत.
निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील सातही विभागात सुरू असलेल्या आॅटोमोबाईल उद्योगांची माहिती एमआयडीसीचे अधिकारी आणि विविध कामगार संघटनांकडून जाणून घेतली. विदर्भात सहायक कंपन्या नसल्याचे कारण पुढे करून देशातील नामांकित आॅटोमोबाईल उद्योजकांनी अन्य ठिकाणी उद्योग स्थापन केले आहेत.
सध्या पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बारामती, ठाणे या जिल्ह्यांमध्ये हजारो युवकांना रोजगार देणारे मोठे उद्योग सुरू आहेत. या उद्योगांवर आधारित सुरू असलेल्या सहायक उद्योगांमध्ये पुणे येथे ४६, नाशिक ९३, कोल्हापूर १३७, औरंगाबाद ५०, बारामती १२, ठाणे येथे ३० आॅटो निर्मिती उद्योग गेल्या २० ते २५ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहेत. याउलट विदर्भात ट्रॅक्टर कंपनी आणि अशोक लेलँड ट्रकच्या सहायक युनिटसह केवळ सहा उद्योग सुरू असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शासनाची असमतोल भूमिका
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाची असमतोल भूमिका आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष केल्याचे सपशेल दिसून येते. रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे. विदर्भात हजारो शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास खुंटला आहे. शिक्षित तरुण पुणे येथे नोकरीसाठी गेल्याने टेक्निकल अपग्रेडेशन थांबले आहे. नागपूर शहर सोडून अन्य ठिकाणी जाण्याची इच्छा नसलेले इंजिनिअर्स शैक्षणिक पेशात आहेत. त्यांना १० ते १५ हजारांच्या जवळपास पगार मिळतो. विदर्भात मोठ्या आॅटो इंडस्ट्री आणि त्यावर आधारित सहायक कंपन्या असत्या तर येथील तरुण या उद्योगांमध्ये मोठ्या हुद्यावर असते आणि विदर्भाचा विकास झाला असता. १५ ते २० वर्षांत अनेक आॅटो कारखाने निघाले. आम्हाला काहीच माहिती नाही. या वेदना आहेत.
नागपूर देशाचे मध्यवर्ती शहर
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि देशाचे मध्यवर्ती शहर आहे. येथे जागेची उपलब्धता आणि प्रस्तावित उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक घटक आहेत. नागपूर हे रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गे जोडले आहे. त्यानंतरही उद्योजक नवे उद्योग वा विस्तारीकरण प्रकल्प नागपुरात स्थापन करण्यास उत्सुक नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असून, त्यांना विदर्भाची माहिती आहे. त्यामुळेच विदर्भात आॅटो हब स्थापन व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्यापासून आहे.
नेत्यांनी ताकदीचे आश्वासन द्यावे
औद्योगिक शांतता, राजकीय आणि शासकीय पाठिंब्याचे जो नेता आश्वासन देतो, तिथेच उद्योग सुरू होतात, असा अनुभव असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. नेत्यांमध्ये इच्छाशक्ती असावी, पोकळ आश्वासनांना बगल देताना ताकदीचे आश्वासन देण्याची नेत्यांची भूमिका असावी, तरच विदर्भाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.

Web Title: 'Auto hub' should be in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.