मीरारोड: वर्दीवर हात टाकणाऱ्या रिक्षाचालकास घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:24 PM2021-08-24T19:24:36+5:302021-08-24T19:26:51+5:30
वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी फाडून शिवीगाळ, धक्काबुक्की केल्या प्रकरणी रिक्षा चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी फाडून शिवीगाळ, धक्काबुक्की केल्या प्रकरणी रिक्षा चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक कडे जाणाऱ्या फेस १ च्या मार्गावर रिक्षाचालक विजय श्रीकांत झा व कार चालक राजेंद्र कुमावत यांच्यात रविवारी वाहन अपघात वरून वाद सुरू झाला. तेव्हा कुमावत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक (गोल्डन नेस्ट ) वाहतूक चौकी येथे जाऊन तेथील पोलिसां कडे मदत मागितली.
रिक्षा चालकाने आपल्या गाडीला ठोकले व तो वरून मलाच शिवीगाळ करत असल्याचे सांगितल्या वरून वाहतूक पोलीस सिद्धार्थ भालेराव, सहाय्यक फौजदार दत्तात्रय महाडिक व मनीष शिंदे हे तिघे रिक्षाचालकाला समजण्यासाठी गेले. पोलिसांनी दोघांना रस्त्यावर भांडू नका, पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करा असे सांगितले.
परंतु रिक्षाचालक विजय झा याने भालेराव यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. धक्काबुक्की करत शर्टाचे बटन तोडून शर्ट फाढला तसेच महाडिक यांना सुद्धा शिविगाळी करत अंगावर धावून गेला. अखेर पोलीस व लोकांनी मिळून रिक्षाचालकास पकडून नवघर पोलीस ठाण्यात नेले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .