सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:07 PM2022-01-08T12:07:56+5:302022-01-08T12:08:06+5:30

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याच्या अनुषंगाने कृषिमंत्री भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार यांच्यासह स्कायमेट वेदर सर्विसेसचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Automatic weather stations to be set up in 6,000 gram panchayats | सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे

सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायत स्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याच्या अनुषंगाने कृषिमंत्री भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार यांच्यासह स्कायमेट वेदर सर्विसेसचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात मंडळस्तरावर २ हजार ११९ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर ही स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्याचा विचार सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये ही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या. पहिल्या टप्प्यात पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जातील, असेही भुसे यांनी सांगितले.

या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये महावेध प्रणाली अंतर्गत संकलित होणारी माहिती सुरक्षित राहील, यासाठी स्कायमेटने व्यवस्था करावी. सध्या फळपीक विमा राबविण्यात येत असलेल्या क्षेत्रात अशी केंद्रे आहेत. पहिल्या टप्प्यात किमान एका मंडळातील दोन ग्रामपंचायतीमध्ये तरी ही केंद्रे उभारावीत तसेच राज्यातील प्रत्येक विभागात ती असावीत, असे सचिव डवले यांनी स्कायमेटच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

सध्या महावेध प्रणालीमार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. विमा कंपन्याही ही माहिती स्कायमेटकडून घेतात. त्यामुळे अधिकाधिक भागात ही केंद्रे कार्यान्वित झाली तर तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान आदींची माहिती मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि कृषिविषयक सल्ला मिळण्याबाबतही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत. पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठीही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत.

Web Title: Automatic weather stations to be set up in 6,000 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान