चकमकीतील मृत नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 08:23 PM2021-05-22T20:23:41+5:302021-05-22T20:24:23+5:30
तिघे छत्तीसगमधील रहिवासी; रविवारी नातेवाईकांकडे सोपविणार
गडचिरोली : पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत शुक्रवारी ठार झालेल्या १३ नक्षलवाद्यांच्या मृतदेहाचे शनिवारी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रविवारी त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह सोपविले जाणार आहे. १३ मृतांपैकी १० जण गडचिरोली जिल्ह्याचेच रहिवासी असून ३ जण छत्तीसगड राज्यातील आहेत.
शुक्रवारी दुपारी सर्व मृतदेह गडचिरोलीत आणल्यानंतर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर हे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी आपल्या शरीरात कोणती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तर लपविली नव्हती ना, याबाबतची शहानिशा करण्यासाठी मृतदेहांचे स्कॅनिंग केले जाते. त्यानंतर शवविच्छेदन केले जाते. शनिवारी दिवसभर ही प्रकिया सुरू होती.
दरम्यान हे नक्षलवादी ज्या मूळ गावातील रहिवासी आहेत तेथील त्यांच्या कुटुंबियांना माहिती देऊन मृतदेह नेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. जे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी समोर येतील त्यांना ते सोपविले जाणार आहे.