बीएस ६ मानकाचे इंधन पंपांवर झाले उपलब्ध; रस्त्यावर धूरमुक्त वाहने धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:16 AM2020-03-14T02:16:45+5:302020-03-14T06:36:26+5:30
प्रदूषणकारी सल्फर १० मिलिग्रॅमपर्यंत घटविले
संतोष भिसे
सांगली : बीएस ६ मानकाची वाहने रस्त्यावर येताच राज्यभरात बीएस ६ श्रेणीचे इंधनही उपलब्ध झाले आहे. धुराला कारणीभूत सल्फर नव्या इंधनात पाचपटींनी कमी झाले आहे. यामुळे नवी वाहने धूरमुक्त असतील.
इंधन कंपन्यांनी १ एप्रिलपासून बीएस ६ इंधन उपलब्ध होईल, असे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात जानेवारीपासूनच या श्रेणीचे पेट्रोल उपलब्ध झाले, विक्री मात्र बीएस ४ म्हणूनच सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात डिझेलचे बीएस ४ ते बीएस ६ हे स्थित्यंतर फेब्रुवारीपर्यंत कंपन्यांनी पूर्ण केले. हिंदुस्थान पेट्रोलियमने मुंबईत रसायनी येथील रिफायनरीपासून पाईपलाईनद्वारे बीएस ६ इंधन सांगलीत हजारवाडी, सोलापूर, पुणे आदी डेपोंना पुरविले. त्यासाठी कट अॉफ डेट निश्चित केली. दोन दिवसांचा शंटिंग पिरीयड ठेवला. या कालावधीत बीएस ४ बंद करून बीएस ६ प्रवाहित केले. या प्रक्रियेत जुने व नवे इंधन अत्यल्प प्रमाणात मिक्स झाले. पंपांना व ग्राहकांना मात्र बीएस ४ म्हणूनच पुरविले. एका अर्थाने ग्राहकांना जुन्या किमतीतच उच्च दर्जाचे इंधन मिळाले. भारत पेट्रोलियमने पंपांच्या टाक्यांमध्ये ३०० ते ५०० लिटरचा जुन्या इंधनाचा किमान स्टॉक ठेवून नवे इंधन भरले. बारा हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये अवघे तीन-पाचशे लिटर जुने इंधन मिसळले गेले. मात्र त्यामुळे फारसा फरक जाणवला नाही.
सल्फर १० मिलिग्रॅमपर्यंत
इंधनातील सल्फरच्या ज्वलनातून कार्बन मोनोक्सॉईड, कार्बन डायअॉक्साईड, हायड्रो कार्बन आणि नायट्रोजन आॅक्साईड हे वायू बाहेर पडतात. बीएस ४ श्रेणीमध्ये एक किलो इंधनात ५० मिलिग्रॅम सल्फर असायचे. बीएस ६ श्रेणीत ते पाचपटींनी कमी करून १० मिलिग्रॅमपर्यंत ठेवले आहे. त्यामुळे ज्वलनानंतर घातक वायूंचे प्रमाणही पाचपटींनी कमी होणे अपेक्षित आहे. एका अर्थाने नवी वाहने धूरमुक्त असतील.
बीएस ६ इंधनाचे फायदे
सल्फर नीचांकी स्तरावर, त्यामुळे धूरमुक्त वाहने. चांगल्या ज्वलनांकामुळे वाहनांची ताकद तथा अॅव्हरेज वाढण्याचा दावा
दोन महिन्यांपासूनच बीएस ६ इंधनाची विक्री करत आहोत. अधिकृतरित्या १ एप्रिलपासून जाहीर होईल. या बदलासाठी जानेवारी ते एप्रिलपर्यंतचा कालावधी मिळाला. सध्या नव्या श्रेणीचे डिझेल-पेट्रोल उपलब्ध आहे. - श्रीरंग केळकर, सत्यजित पाटील, वितरक, सांगली