मराठवाड्यावर अवकाळ, बीड जिल्ह्यातपाच मृत्युमुखी

By admin | Published: March 16, 2017 06:46 AM2017-03-16T06:46:29+5:302017-03-16T06:46:29+5:30

राज्यात नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच बुधवारी मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले

Avalak on Marathwada, killed only in Beed district | मराठवाड्यावर अवकाळ, बीड जिल्ह्यातपाच मृत्युमुखी

मराठवाड्यावर अवकाळ, बीड जिल्ह्यातपाच मृत्युमुखी

Next

औरंगाबाद/सोलापूर : राज्यात नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच बुधवारी मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. रब्बीचा हंगाम जोमात असताना या गारपीटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. ज्वारी, गहू, हरभऱ्यासह आंबा आणि द्राक्षाचे प्रचंड नुकसान झाले. वीज पडून बीड जिल्ह्यात पाच जणांचा तर सोलापुरात एका जणाचा बळी गेला.
मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या सहा जिल्ह्यांत अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. लातूर शहर, तालुक्यासह औसा तालुक्यालाही पावसाने झोडपले. निलंगा, शिरूर अनंतपाळ, उस्तुरी, मुरुड, औराद शहाजानी, चिंचोली (ब.), अहमदपूर, देवणी, आलमला, कोकळगाव, सावरी, मुदगड एकोजी, नदी हत्तरगा, सांगवी, हडोळती आदी भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. लिंबाळा दाऊ येथे गारपीट झाल्याने ज्वारी व हरभऱ्याचे पीक भुईसपाट झाले. चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही गारपिटीचा फटका बसला. सायंकाळी पाचच्या सुमारास तुफान वादळी-वाऱ्यासह गारपीट झाली. ठिकठिकाणी विजा पडून जवळपास पाच जनावरे दगावली आहेत. बीड जिल्ह्यात गेवराई, बीड, अंबाजोगाई, गेवराई येथील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळी, केज तालुक्यात वीज पडून प्रत्येकी दोघांचे बळी गेले, तर आष्टी तालुक्यात एकाला प्राण गमवावे लागले.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, गंगाखेड, परभणी, पालम तालुक्यांनाही गारपिटीने झोडपले. सोनपेठ तालुक्यातील लासिना, विटा, पिंपळगाव, उक्कडगाव येथे अर्धा तास गारा पडल्या़
नांदेड जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी दुपारनंतर अवकाळी पाऊस झाला. माळाकोळी, बारूळमध्येही मुसळधार पाऊस झाला. बाऱ्हाळी, मुखेड, लोहा, धर्माबाद, निवघा बाजार, देगलूर, उमरी, कंधार, भोकर, नरसी, सगरोळी अशा विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली़ हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात सायंकाळच्या सुमारास मुसळधार सरी कोसळल्या.


सोलापूर जिल्ह्याला सायंकाळी पावसाने झोडपले़ अनेक घरांवरील पत्रे उडून गेले़ सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढा तालुक्यांना बसला़ काही ठिकाणी गारपीट झाली. द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांना मोठा फटका बसला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. अक्कलकोट तालुक्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला.

२.७० लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान
कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या लातूर जिल्ह्यात गव्हाच्या पिकाचे १७ हजार ३७० हेक्टरवर नुकसान झाले आहे. ज्वारीचे ३८ हजार ८२८, मका ४ हजार ७२४, इतर धान्य ४२७, हरभरा १ लाख ९४ हजार ५१८, जवस ३४८, सूर्यफुल ७४८, करडई ११ हजार ८०६ असे एकूण जवळपास २ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आजही पावसाची शक्यता : मराठवाडा व विदर्भात गुरुवारी काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Web Title: Avalak on Marathwada, killed only in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.