वृक्षसंवर्धनासाठी झटतोय अवलिया!
By admin | Published: December 6, 2015 02:33 AM2015-12-06T02:33:10+5:302015-12-06T02:33:10+5:30
वृक्षारोपणानेच पर्यावरणाचा ढासळलेला समतोल साधला जाऊ शकतो, या विचाराने एक अवलिया वृक्षसंवर्धनासाठी अकोला जिल्ह्यात झटत आहे. त्याने गेल्या सात महिन्यांत
- अतुल जयस्वाल, अकोला
वृक्षारोपणानेच पर्यावरणाचा ढासळलेला समतोल साधला जाऊ शकतो, या विचाराने एक अवलिया वृक्षसंवर्धनासाठी अकोला जिल्ह्यात झटत आहे. त्याने गेल्या सात महिन्यांत स्थानिकांच्या मदतीने जिल्ह्यात तब्बल ५ हजार झाडे लावली असून, पुढील काही काळात १५ हजारांपेक्षा जास्त झाडे लावण्याचा संकल्प त्याने सोडला आहे.
तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम् जिल्ह्यातील हरियानकोटई या छोट्याशा गावातून आलेल्या ए.एस. नाथन यानेया कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे.
शासनाकडून होत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत जोपर्यंत स्थानिकांचा सक्रिय सहभाग लाभत नाही, तोपर्यंत ती मोहीम व्यर्थ ठरते, ही वस्तुस्थिती हेरून नाथनने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह यांची भेट घेऊन त्यांना आपली योजना सांगितली. या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील अधिकाऱ्यांना नाथनला वृक्षसंवर्धनात मदत करण्यास सांगितले.
त्यानुसार नाथनने आतापर्यंत तेल्हारा, बार्शीटाकळी, आकोट
व मूर्तिजापूर या चार तालुक्यांमध्ये
५ हजार झाडे स्थानिकांच्या
मदतीने लावली आहेत. अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांमध्ये आणखी १० हजार झाडे लावण्याचा त्याचा मानस आहे.
वृक्षारोपण कायदा सक्तीचा व्हावा
देशात वृक्षारोपण सक्तीचे करणारा कायदा व्हावा, यासाठी तो जनजागृती करीत आहे. वृक्षारोपण केल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय देशात कुणालाही कोणत्याही प्रकारची सरकारी प्रमाणपत्रे मिळू नयेत, असा कायदाच देशात पारित करायला हवा, असे नाथनचे मत आहे.
सात वर्षांपूर्वी नाथन मुंबईत आला. त्याने वृक्षसंवर्धनाचे काम सुरू केले. या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे निरी या संस्थेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी त्याची भेट झाली. डॉ. भटकरांनी नाथनला अकोला जिल्ह्यात काम करण्याचे सुचविले. त्यानुसार नाथन मार्च महिन्यात मूर्तिजापूर येथे आला व त्याने येथे वृक्षसंगोपनाचे कार्य सुरू केले.
प्रत्येक झाडाला ‘ट्री कोड’
- वृक्षारोपण मोहीम राबविण्याआधी नाथन त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांकडून एक अर्ज भरून घेतो. त्यामध्ये नाव, आधार क्रमांक अशी वैयक्तिक माहिती व तो जे झाड लावणार, त्याचा क्रमांक नमूद असतो.
- अशा प्रकारे त्या व्यक्तीला त्या झाडाशी ‘लिंक-अप’ केले जाते. त्यानंतर त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित व्यक्तीकडे देण्यात येते.