पशू, पक्ष्यांसाठी मासिक ७ हजारांची पदरमोड करणारा अवलिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 05:48 PM2018-09-15T17:48:06+5:302018-09-15T17:49:54+5:30
जखमेमुळे विव्हळत पडलेल्या जवळपास २०० पक्ष्यांवर उपचार करुन जीवनदान दिले आहे.
लातूर : माणूस स्व-केंद्री झाल्याने दुसऱ्यांच्या सुख- दु:खात सहभागी होत नाही, याची प्रचिती बहुतांश मंडळींना येते. परंतु, लातुरातील महेबूब चाचा हे मुक्या पशू, पक्ष्यांसाठीच जगत आहेत. जखमेमुळे विव्हळत पडलेल्या जवळपास २०० पक्ष्यांवर त्यांनी उपचार करुन जीवनदान दिले आहे. पक्ष्यांसाठी मासिक ७ हजार रूपयांची ते पदरमोड करीत असल्याने त्यांच्या घरी किलबिलाटच असतो.
शहरातील मळवटी रोडवरील बुऱ्हाणनगरात राहणाऱ्या महेबूब इसाक सय्यद यांचे पत्र्याचे घर आहे. बालपणापासूनच ते पशू- पक्षांत रमायचे. आजघडीला त्यांच्या घरी हंस, ससे, चिनी कोंबड्या, कबुतरे, साळुंक्या, बुलबुल, चिमण्या, कावळे आदी पक्ष्यांची १०० पेक्षा जास्त घरे आहेत. त्यांचे घर हे ४० बाय ४० चौ. मी. चे असून पक्ष्यांसाठीच त्यांनी १५ बाय ४० चौ. मी. जागा खुली ठेवली आहे. त्यात त्यांनी विविध फळांच्या झाडांची लागवड केली आहे. पक्ष्यांसाठी घरात ५० पेक्षा जास्त पाण्याच्या कुंड्या, अन्नासाठी भांडी बांधले आहेत.
पशू, पक्ष्यांच्या पाण्यासाठी काढले कर्ज
पशूधनासाठी त्यांनी पाण्याचे हौद बांधले आहेत. परंतु, २०१४ मध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने काही पशूधन पाण्याविना परतत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी ७० हजारांचे खाजगी कर्ज काढून बोअरवेल खोदली. सुदैवाने १८० फुटावर ४ इंच पाणी लागले आणि पाण्याची अडचण दूर झाली.
‘राजकुमार’ दगावला अन् ढसाढसा रडले
तीन वर्षांपूर्वी आजाराने त्रस्त असलेला कुत्रा आढळून आला. त्यांनी त्यास घरी आणून उपचार केले. त्यानंतर त्याचे राजकुमार असे नाव ठेवले. कुत्रा आणि ससा, मांजर असे प्राणी एकमेकांचे शत्रू परंतु, राजकुमार नावाचा श्वान आणि इतर प्राणी हे जणू मित्रच झाले होते. गुरुवारी दुपारी महेबूब चाचा वृक्षांना पाणी देत असताना तोंडात फेस आलेला राजकुमार (श्वान) त्यांच्या पायात येऊन पडला. त्यांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु, निपचित पडलेला राजकुमार पाहून ते ढसाढसा रडले. त्यानंतर सावरत त्यांनी मयत व्यक्तीचा ज्या प्रमाणे अंत्यसंस्कार केला जातो, त्याच पध्दतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.