साबणाच्या वडीवर अवतरले गणराय
By admin | Published: September 8, 2016 10:08 PM2016-09-08T22:08:19+5:302016-09-08T22:08:19+5:30
भारतीय संस्कृतीत विविध सणोत्सव साजरे केले जातात.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 8 - भारतीय संस्कृतीत विविध सणोत्सव साजरे केले जातात. परंतु या परंपरांचा वारसा जपत आणि कला-गुणाच्या अंगभूत कौशल्यांद्वारे आपल्या छंदाला ओळख मिळवून देणे क्वचितच काही जणांना जमते. नीलिमा हजारे-मून यांनी मात्र हे कौशल्य साधले आहे. साबणाच्या वडीवर त्यांनी गणरायाची विविध व आकर्षक रूपे साकारली आहेत. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डनेही त्यांच्या या कलेची दखल घेतली आहे.
नीलिमा या सातव्या वर्गात असताना त्यांच्या भावाने त्यांना पहिल्यांदा खडूवर कोरीव काम करण्यास सांगितले. त्यांनी सहज ते करून पाहिले. पण, जे केले ते अतिशय कल्पकतेने केल्याने त्या निर्जीव खडूमध्येही बोलकी प्रतिकृती दिसायला लागली. हा क्षणच या छंदाची सुरुवात होती. पुढे शाळेत त्यांना पाठक सर मिळाले. त्यांनाही असे कोरीव शिल्प साकारण्याचा छंद होता. त्यांनी नीलिमा यांना प्रोत्साहन दिले आणि या कलेचे तांत्रिक शिक्षणही दिले. साबणावर असे शिल्प जास्त उठून दिसते म्हणून मग साबणावर प्रयोग सुरू झाले.
गणपती ही कलेची देवता असल्याने नीलिमा यांनी साबणाच्या वडीवर गणरायांची विविध व आकर्षक शिल्पे साकारली. केवळ गणेशजीच नाही तर लोकमान्य टिळक, महात्मा गांधीसारखे थोर नेते, शाहरुख खान, अतिमाभ बच्चन सारखे चित्रपट कलावंत व ओळखीचे अनेक चेहरेही त्यांनी साबणावर कोरले. नील्ीिमा यांंच्या या छंदाने त्यांना नागपूरसह विदर्भात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.