पक्ष्यांसाठी शेत राखणारा अवलिया; शेतकऱ्याचं असंही पक्षीप्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:08 AM2019-03-14T02:08:40+5:302019-03-14T02:09:00+5:30
उन्हाची तीव्रता वाढल्याने पक्षीप्रिय शेतकऱ्याने घेतला निर्णय
वाकी बुद्रुक : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पाणी आणि चारा असा मोठा प्रश्न प्रत्येक सजीवाला उन्हाळ्यात भेडसावत असतो. याच पार्श्वभूमीवर वाकी बुद्रुक गावातील शेतकरी सोमनाथ टोपे यांनी आपल्या शेतातील १४ गुंठे ज्वारीची शेती पक्ष्यांना चरण्यासाठी राखली आहे.
उन्हाळ्यात पक्ष्यांना चारा मिळविण्यासाठी खूप भटकावे लागते. परंतु, जागोजागी धान्यांची राखण करण्यासाठी शेतकरी विविध योजना आपल्या शेतामध्ये आजमावत असतात. त्यामध्ये जुन्या कॅसेटमधील रिळे शेतात पसरवणे, बुजगावणे उभं करणे, गलोलच्या मार्फत दगड मारणे अशा योजना शेतकरी आजमावतात. परंतु मुक्या जिवांवर प्रेम करत शेतकरी सोमनाथ टोपे यांनी यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यात १४ गुंठे ज्वारीची शेती पक्ष्यांसाठी राखून ठेवली आहे.
यापुढील काळात याच शेताच्या परिसरात छोट्या-मोठ्या पक्ष्यांना पाणीसाठेदेखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षी व निसर्ग यांच्याशी आपण जोडलो गेलो आहोत म्हणून यावर्षी माझ्या शेतातील ज्वारी पक्ष्यांसाठी राखून ठेवली आहे, असे मत त्यांनी व्यक्तकेले.