राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:40 IST2025-04-15T11:38:24+5:302025-04-15T11:40:21+5:30
महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा शिल्ल्क असल्याने राज्यासमोर पाणीसंकट उभे राहिले आहे.

राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?
महाराष्ट्रासमोर पाणीसंकट उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एकूण ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, यात पुण्यातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त ३६.३१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. अद्याप एप्रिल महिना उलटला नाही आणि पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे.
राज्यात एकूण २ हजार ९९७ धरणे आहेत, ज्यात लहान ते मोठ्या संरचनांचा समावेश आहे, ज्यांची एकत्रित जिवंत साठवण क्षमता ४० हजार ४९८ दशलक्ष घनमीटर आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत राज्यातील धरणांत फक्त ३० हजार ०३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांत ३५.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. हे प्रमाण किंचित चांगले असले तरी अधिकारी सावध आहेत.
अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा
राज्य सरकार ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या ७ एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या २२३ टँकर कार्यरत आहेत, जे १७८ गावे आणि ६०६ वाड्यांमध्ये पाणी पोहोचवत आहेत.
कुठे किती पाणी शिल्लक?
दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती ५०.०९ टक्के पाणीसाठ्यासह सर्वात स्थिर स्थितीत आहे. जुलैल्या मध्यपर्यंत अमरावतीकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असे सांगण्यात येत आहे. कोकणात ४९.९६ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर, नागपूर आणि नाशिकमध्ये अनुक्रमे ४१.४९ टक्के आणि ४३.९ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मराठवाड्यातील जलशयांची पाण्याची पातळी ४०.४९ टक्क्यांवर घसरली आहे.
नागरिकांना पाणी जपून वापण्याचे आवाहन
वाढते तापमान आणि पावसाला अजून वेळ असल्याने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. तर, अधिकारी सर्व प्रदेशांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.