आव्हाड आले, स्पष्टीकरणही दिले
By admin | Published: December 22, 2015 02:34 AM2015-12-22T02:34:15+5:302015-12-22T02:34:15+5:30
ठाण्यातील डेव्हलपर्स सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे नाव आल्यानंतर प्रकरण बरेच गाजले.
नागपूर : ठाण्यातील डेव्हलपर्स सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे नाव आल्यानंतर प्रकरण बरेच गाजले. विधानसभेतही या प्रकरणाचा उल्लेख झाला. अधिवेशनाचे दोन आठवडे अनुपस्थित राहिलेले आव्हाड सोमवारी सभागृहात आले व त्यांनी आपले स्पष्टीकरणही दिले. नजीब मुल्ला यांच्या खात्यावरून आपल्या खात्यात रक्कम जमा झालीच नाही, असा दावा करीत आयकर परतावा व भागीदारी कराराशी संबंधित कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांकडे सोपविली.
दोन आठवडे अनुपस्थित असलेले आव्हाड आज विधिमंडळ परिसरात दिसताच सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. विधानसभेत दिवसभराच्या कामकाजात भाग घेतल्यानंतर आव्हाड यांनी या विषयावर सभागृहात आपले स्पष्टीकरण दिले. आव्हाड म्हणाले, १५ डिसेंबर २०१५ रोजी एका लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान नजीब मुल्ला यांच्या खात्यातून माझ्या खात्यावर काही रक्कम ट्रान्सफर झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ही माहिती चुकीची आहे. नजीब मुल्ला, मिलिंद पाटील, विशाल पाटील व मी अशा चौघांनी मिळून ड्रीम होम रिएल्टर्स नावाची बांधकाम क्षेत्रातील कंपनी सन २००८मध्ये स्थापन केली. सन २०१०पासून आयकर खात्याला कराच्या स्वरूपात त्याची माहिती देण्यास सुरुवात केली. सदर कंपनीच्या माध्यमातून २०१४-१५च्या आयकर विभागाला देण्यात आलेल्या अधिकृत माहितीमध्ये प्रत्येकी १ कोटी ७ लाख रुपये आम्हा भागीदारांच्या नावावर मेहनताना दाखविण्यात आलेला आहे. असाच मेहनताना सन २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४मध्ये प्रत्येक भागीदाराच्या नावावर दाखविण्यात आलेला आहे. सदरचा नफा आजपर्यंत त्या कंपनीकडून माझ्या खात्यात आलेला नाही. त्यामुळे ती रक्कम नजीब मुल्ला यांच्या खात्यावरून माझ्या खात्यावर जमा झाली, असा अर्थ निघू शकत नाही, असे त्यांनी अध्यक्षांना सांगितले.