अविनाश बिनिवाले; एका बहुभाषाकोविदाचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 09:37 AM2018-02-27T09:37:39+5:302018-02-27T09:37:39+5:30

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ भाषाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बिनिवाले यांचा लेखन, भाषा अध्ययन आणि अध्यापनाचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

Avinash Biniwale; Honor of a Multilingual Coach | अविनाश बिनिवाले; एका बहुभाषाकोविदाचा सन्मान

अविनाश बिनिवाले; एका बहुभाषाकोविदाचा सन्मान

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे राजभाषा दिनानिमित्त अविनाश बिनिवाले यांचा डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कारने सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ भाषाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बिनिवाले यांचा लेखन, भाषा अध्ययन आणि अध्यापनाचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

बिनिवाले यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यानंतर पुणे, मुंबई आणि हैदराबाद येथे झाले. लहानपणापासून विविध भाषांबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.  एके दिवशी त्यांचे वडील आणि आत्या यांना फ्रेंचमध्ये बोलताना ऐकले, त्यानंतर बिनिवाले यांनी तात्काळ फ्रेंच शिकण्याचा निर्णय घेऊन वडिलांकडून फ्रेंच शिकून घेतले. त्यांची आणखी एक आत्या नागपूरला राहात असे. तेथे या आत्याचा रामकृष्ण मठामुळे बंगाली भाषेशी संपर्क आला होता. बंगाली भाषेची तिच्याकडे असणारी पुस्तके पाहून बिनिवाले यांनी बंगालीही शिकण्यास सुरुवात केली.

साधारणतः मराठी किंवा इत्तर उत्तर भारतीय भाषक दक्षिणेच्या भाषा शिकण्यास विनाकारण भीती बाळगतात असे ते म्हणतात. या भाषांबद्दल अकारण गैरसमज पसरवून त्या शिकायला कठिण आहेत असे म्हटले जाते. पण बिनिवाले यांनी या सर्व दाक्षिणात्य द्रविड भाषा लिपिसह आत्मसात केल्या आहेत. 
शालेय शिक्षणानंतर बिनिवाले यांनी विद्यापीठाचा जर्मन भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला. मात्र त्यातील फारच थोडे लोक डिप्लोमाच्या अभ्यासक्रमाला येऊ शकले. यामागचे कारण विचारताच सर्वत्र जर्मन हे इंग्रजीतून शिकवले जात होते. त्यामुळे विद्यार्थी पुढे टिकत नसत. त्यामुळे बिनिवाले यांनी परदेशी भाषा मराठीतून शिकवण्याची सोय व्हावी अशी मागणी केली. पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्यापर्यंत हे प्रररण गेले मात्र शिकवण्याची साधने मराठीत नसल्याने जर्मन शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यास विरोध केला. शेवटी बिनिवाले यांनीच जर्मनचे मराठीतून व्याकरण आणि जर्मन-मराठी- जर्मन शब्दकोश तयार केला. त्यानंतर त्यांनी गुजरातीमधूनही जर्मनचे व्याकरण आणि शब्दकोश तयार केला. अशाच रितीने त्यांनी फ्रेंचसाठीही काम केले . फ्रेंच आणि रशियन भाषेतील कादंबर्याही त्यांनी अनुवादित केल्या आहेत.

१९८८ साली मणिपूर येथे विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकवण्यासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. ईशान्य भारतामध्ये काम करण्यासारखे भरपूर आहे असे दिसलमयावर बिनिवाले यांनी ईशान्य भारतात प्रदीर्घ काळ अध्यापनाचे काम केले. भाषा या संवादाच्या माध्यम आहेत तशा रोजगाराच्या साधनही आहेत असे ते सर्वांना सांगतात. उगाचच आवड नसलेल्या विषयात पदवी मिळवण्यापेक्षा एखादी भाषा पदवी आणि त्यापुढच्या अभ्यासक्रमांत आत्मसात केली तर त्याचा आयुष्यभरासाठी उपयोग होऊ शकतो असं त्यांचं मत आहे. मराठी मुलांनी थोडे परिश्रम आणि चिकाटीने भाषा शिकण्याचे हे काम केले तर रोजगार आणि जगाचे नवे दालन त्यांच्यासाठी खुले होईल असे बिनिवाले म्हणतात.
 

Web Title: Avinash Biniwale; Honor of a Multilingual Coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.