अवनी प्रकरण : पुण्याच्या शूटरकडे होते ५ ठिकाणांचे प्लानिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 06:21 AM2018-11-07T06:21:32+5:302018-11-07T06:22:10+5:30
अवनी वाघिणीचे एन्काउंटर करण्यासाठीच हैदराबादहून शार्पशूटर नवाब शफाअत अली खान यांना बोलावण्यात आले होते, असे वन विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
- श्रीकिशन काळे
पुणे : अवनी वाघिणीचे एन्काउंटर करण्यासाठीच हैदराबादहून शार्पशूटर नवाब शफाअत अली खान यांना बोलावण्यात आले होते, असे वन विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. अवनीला शूट करण्यासाठी त्यांना परवानगी होती. प्रत्यक्षात त्यांचा मुलगा असगर अली याने अधिकार नसताना अवनीला गोळी घातली. पुण्याच्या शूटरकडे अवनीला पकडण्याचे पाच ठिकाणांचे नियोजन होते, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला
अवनीला ठार मारायचे नव्हते, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी केले आहे. खरे तर तिचे एन्काउंटर करण्यासाठीच नवाब खानला पाचरण केल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात तीन शार्पशूटर असताना हैदराबादहून खानला कशाला बोलावले, असा सवाल प्राणीप्रेमी विचारत आहेत. अवनीला पकडण्यासाठी पुण्यातील शार्पशूटर चंद्रकांत मंडलिक यांना बोलावण्यात आले होते. त्यांनी जंगलाची पाहणी करून तिला पकडण्यासाठी नियोजनही केले होते. अवनीला जिवंत जेरबंद करण्यासाठीची परवानगीही मंडलिक यांनी मनगुंटीवार यांना पत्राद्वारे मागितली होती.
मंडलिक म्हणाले, अवनीला जिवंत पकडून पिंजऱ्यात ठेवता आले असते. त्यासाठी मी पांढरकवडा परिसरात गेलो होतो. तीन दिवसांपूर्वीच परत पुण्यात आलो. खरंतर नवाब खान हा शिकारीच आहे. त्याला त्यासाठीच बोलावले होते. वन विभागातही दोन गट पडले होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा हे अवनीला ठार करण्यासाठी नवाब खानला पाठिंबा देत होते. पण इतर बरेच अधिकारी त्याला विरोध करत होते.
आम्ही गेल्या काही दिवसांपासून अवनीला पकडण्यासाठी प्रयत्न करत होतो. खरं तर तिला पकडणे हा आमचा उद्देश होता, पण आता तिच्या बछड्यांना आम्ही शोधून त्यांची काळजी घेणार आहोत.
- सुनील लिमये,
मुख्य वन संरक्षक, यवतमाळ.