अवनी वाघिणीचे बछडे दिसले, वन विभागाच्या पथकाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:44 PM2018-11-15T13:44:27+5:302018-11-15T13:45:32+5:30
पेट्रोलिंग करणाऱ्या वन विभागाच्या पथकाने यवतमाळमधील विहिरगावजवळ टी-१ वाघिणीचे बछडे रस्ता ओलांडताना दिसल्याचा दावा केला आहे.
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपूर्वी नरभक्षक टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या अनाथ झालेल्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने युद्धस्तरावर शोधमोहिम सुरू केली आहे. दरम्यान, गुरुवारी पेट्रोलिंग करणाऱ्या वन विभागाच्या पथकाने यवतमाळमधील विहिरगावजवळ टी-१ वाघिणीचे बछडे रस्ता ओलांडताना दिसल्याचा दावा केला आहे.
पांढरकवड्यातील या वाघिणीला वनखात्याने टी-१ हे नाव दिले होते. मात्र, या परिसरातील ही वाघीण ‘अवनी’याच नावाने ओळखली जात होती. टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर वनविभागाचे पथक तिच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी सराटी, बोराटी, वरूड, भुलगड आदी भागातील जंगल परिसर पिंजून काढत आहे. टी-१ वाघिणीचे बछडे आपल्या आईच्या शोधार्थ इतरही ठिकाणी भटकू शकतात. त्यामुळे वनविभागाच्या शोध पथकाने बोराटी जंगलात ज्या नाल्याजवळ टी-१ वाघिणीला मारले, त्या परिसरात आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
टी-१ वाघिणीसोबत राहणारा नर वाघसुद्धा याच परिसरात असल्यामुळे हा वाघ या ११ महिन्याच्या बछड्यावर केव्हाही हल्ला करू शकतो. त्यामुळे या बछड्यांना तातडीने बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. या बछड्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता वनविभागासमोर आहे.