१२०० कोटींचे सरकारी नुकसान टाळण्यासाठी तुरीची होणार डाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:40 AM2018-05-14T03:40:49+5:302018-05-14T03:40:49+5:30
गतवर्षी हमी केंद्रावर खरेदी करण्यात आलेली तूर प्रक्रियेअभावी पडून आहे. वर्ष संपत आल्याने ही तूर खराब होण्याची शक्यता वाढली आहे.
रूपेश उत्तरवार
यवतमाळ : गतवर्षी हमी केंद्रावर खरेदी करण्यात आलेली तूर प्रक्रियेअभावी पडून आहे. वर्ष संपत आल्याने ही तूर खराब होण्याची शक्यता वाढली आहे. मुदत संपत आल्याने सरकारला १२०० कोटींचा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी तुरीवर प्रक्रिया करून शासकीय संस्थांमध्ये ही तूर विकण्याच्या हालचाली सहकार विभागाने सुरू केल्या आहेत.
गतवर्षी खरेदी करण्यात आलेली २५ लाख क्विंटल तूर गोदामात पडून आहे. त्यामध्ये यावर्षीच्या २८ लाख क्विंटल तूर खरेदीने भर घातली आहे. ५२ लाख क्विंटल तूर गोदामामध्ये पडून आहे. गतवर्षी खरेदी करण्यात आलेल्या तुरीची मुदत संपत आली असल्याने त्यावर प्रक्रिया न केल्यास ती मातीमोल होण्याचा धोका आहे. यामुळे सहकार विभागाला १२०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
हे नुकसान टाळण्यासाठी तुरीवर प्रक्रिया करून शासकीय आस्थापनांना देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. यामध्ये अंगणवाडी, बालवाडी, शाळा, देवस्थाने, कारागृह आणि रेशन दुकानामध्ये तुरडाळ विकली जाणार आहे. या शासकीय तुरडाळीची किंमत ५५ रुपयांच्या घरात राहणार आहे. त्यासाठी अंगणवाडी, मध्यान्ह भोजनासाठी तुरडाळ खरेदीचा करारही करण्यात आला आहे. यासोबतच शेगाव, शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, गुरुद्वारामध्ये संपर्क साधून या ठिकाणी दररोजच्या व्यवस्थेसाठी डाळ पुरविली जाणार आहे.
यासोबतच कारागृहातील कैद्यांच्या भोजनासाठी डाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेशन दुकानामध्ये माफक दरामध्ये तुरडाळ उपलब्ध होणार आहे. याकरिता दुकानदारांना ५० टक्के रक्कमच जमा करावी लागणार आहे.