रुग्णांची गैरसोय टाळा; आवश्यक दक्षता घ्या

By admin | Published: November 11, 2016 02:20 AM2016-11-11T02:20:07+5:302016-11-11T02:20:07+5:30

केंद्र शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या अडचणीमुळे कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही

Avoid Patient Inconvenience; Take necessary precautions | रुग्णांची गैरसोय टाळा; आवश्यक दक्षता घ्या

रुग्णांची गैरसोय टाळा; आवश्यक दक्षता घ्या

Next

पुणे : केंद्र शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या अडचणीमुळे कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व रुग्णालयांनी घ्यावी. ही परिस्थिती हाताळण्यासाठी रूग्णालयात योग्य व अनुभवी व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी, असे आदेश सहधर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी काढले आहेत.
केंद्राने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या, तरी नवीन नोटा उपलब्ध होईपर्यंत हॉस्पिटल व औषध विक्रेत्यांनी मात्र या नोटा स्वीकाराव्यात, असे बंधन घालण्यात आले होते. मात्र, तरीही रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. गुरुवारीही अनेक रुग्णालयांमध्ये तसेच औषधाच्या दुकानांमध्ये पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारल्या गेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, धर्मादाय आयुक्तांनी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश सर्व धर्मादाय रुग्णालयांना दिले आहेत.
गुरुवारपासून बँकांमधून नोटा बदलून मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दररोज केवळ ४ हजार रुपयेच काढता येतील, असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे दवाखान्यांची लाखो रुपयांची बिले भरण्यास अडचणी येत आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे भरण्यास अडचण आल्यास त्यांना हॉस्पिटलकडून योग्य ते सहकार्य करण्यात यावे. कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच रुग्णांच्या अडचणींचे निराकरण करावे, असे सहधर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
एटीएममधून दिवसाला फक्त ४ हजार रुपयेच काढण्याचे बंधन दूर होईपर्यंत रुग्णालयांमधील पैशांची समस्या कायमच राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत रुग्णांना सहकार्य करण्यात यावे, असे धर्मादाय आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


मेडिकलमधून
औषधेही देण्यास
नकार
औषध विक्रेत्यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेणे बंधनकारक असताना अनेक मेडिकलमधून सुट्या पैशांअभावी औषधे देण्यास नकार दिला जात आहे किंवा संपूर्ण ५०० रुपयांची खरेदी करण्याची जबरदस्ती केली जात असल्याचे चित्र गुरुवारी शहरात दिसून आले. औषधविक्रेत्यांकडून होलसेल विक्रेत्यांनीही ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

हजाराच्या नोटा घेतल्याच नाहीत
आम्ही सिंहगड रस्त्यावरील धर्मादाय रुग्णालयात गेलो होतो. तेथे आम्हाला रक्ताच्या चाचण्या व एक्स-रे काढण्यासाठी ३० हजार रुपये लागणार होते. आमच्याकडे एक हजाराच्या नोटा होत्या. त्यांनी त्या नोटा घेण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही सुटे पैसे घेण्यासाठी बँकेत गेलो. मात्र, तेथे नोटा कमी असल्यामुळे आम्हाला फक्त एक हजार रुपये मिळाले. एक हजार रुपये घेऊन रुग्णालयात गेलो असता, पूर्ण पैसे भरल्यानंतरच चाचण्या केल्या जातील, असे रुग्णालयाने सांगितले.
- राहुल कुलकुदरे
(रुग्णाचे नातोईक, वडगाव)

Web Title: Avoid Patient Inconvenience; Take necessary precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.