कडक उन्हात बाहेर फिरणे टाळा
By admin | Published: March 29, 2017 11:57 PM2017-03-29T23:57:24+5:302017-03-29T23:57:24+5:30
ऐन मार्च महिन्यातच उन्हाचा वाढता तडाखा, उष्माघाताचा धोका, स्वाईन फ्लूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
पुणे : ऐन मार्च महिन्यातच उन्हाचा वाढता तडाखा, उष्माघाताचा धोका, स्वाईन फ्लूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल लक्षात घेता उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ््यात आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हलका आणि घरचा आहार, पाण्याचे जास्तीत जास्त सेवन आणि साधा सर्दी, खोकला झाल्यासही त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांतर्फे करण्यात आले आहे.
मार्च ते जून या कालावधीत थकवा येणे, ताप येणे, डोके-पोट दुखणे, भूक न लागणे, मानसिक अस्वस्थता अशा अनेक समस्या उद्भवतात. उन्हामध्ये मजुरी किंवा शेतावर काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे तसेच घट्ट कपडे वापरण्याने त्रास होतो. वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे करणे टाळावे, सैल आणि फिकट रंगाचे कपडे वापरावेत तसेच पाणी व द्रव पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा. उन्हात काम करताना गॉगल, टोपी व रुमाल यांचा अवश्य वापर करावा, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे.
उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या काळात वातावरणातील उष्णता एरवीपेक्षा जास्त असते. बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. या तापमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न शरीर करत असल्याने जास्त प्रमाणात घाम येतो. वातावरणातील उष्णतेने व्यक्तीच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशाप्रकारे शरीरातील पाण्याची पातळी खालावल्याने मेंदूतील थर्मोस्टॅटचे काम बिघडते आणि ताप येतो. हा ताप साधारण १२ तास राहतो व त्यानंतर कमी होतो, काही काळाने पुन्हा येतो. अशाप्रकारे बराच काळ शरीर बाहेरील तापमानाला प्रतिक्रिया देत असते. हा ताप लवकरात लवकर कमी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास व्यक्तीला उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता असते, असे जनरल फिजिशियन डॉ. अच्युत जोशी यांनी सांगितले. अशाप्रकारचा ताप आल्यास जास्तीत जास्त पाणी पिणे, शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढवणे आणि अंग गार पाण्याने पुसून घेणे हे उपाय करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुले व तरुणांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने अशाप्रकारचा विषाणूजन्य तापाचे प्रमाण त्यांच्यात जास्त असते.
हे करा
तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
प्रवास करताना सोबत पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका.
आपलं घर थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्यांचा वापर करा.
अशक्तपणा, कमजोरपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी किंवा ताक इत्यादी प्या.
जनावरांनाही सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
थंड पाण्याने आंघोळ करा.
हे करू नका
दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका.
मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डीहायड्रेशन होतं.
उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका.
पार्किंग केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी झाल्याने आजार उद्भवतात. त्यामुळे स्रायू अशक्त होणे, भोवळ येणे, ताप येणे असे त्रास होतात. या काळात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. हलका आणि द्रवरुप आहार घ्यावा. कलिंगड, टरबूज, शहाळे अशा रसाळ फळांवर भर द्यावा. लहान मुलांना आणि पित्तप्रवृत्तीच्या लोकांना द्राक्षे अथवा आंबट फळे देणे टाळावे. - डॉ. श्रुती देशपांडे, आहारतज्ज्ञ
उन्हाळ््यात भरपूर पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, सनकोटचा आवर्जून वापर करावा. वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे करणे टाळावे, सैल आणि फिकट रंगाचे कपडे वापरावेत, तसेच पाणी व द्रवपदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा. उन्हात काम करताना गॉगल, टोपी किंवा रुमाल यांचा अवश्य वापर करावा. उष्माघात अथवा इतर कोणताही त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियन
विषाणूजन्य आजारांबरोबरच उन्हाळ््यात गोवर, कांजिण्या यांसारख्या विषाणूजन्य आजारांची संख्याही वाढते. उन्हाचा तडाखा जास्त असल्यास या काळात पोट बिघडून गॅस्ट्रोसारख्या आजारांच्या रुग्णांतही वाढ होत असल्याचे डॉ. अच्युत जोशी म्हणाले. उन्हाळ््याच्या काळात उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्यात आल्यास अशाप्रकारचे त्रास उद्भवत असल्याचे ते म्हणाले.