हृदयरोगामुळे होणारा मृत्यू टाळणे शक्य

By admin | Published: September 29, 2015 02:47 AM2015-09-29T02:47:58+5:302015-09-29T02:47:58+5:30

हृदयरोगामुळे अचानक येणारा मृत्यू ही आताच्या काळात सर्वात प्रकर्षाने भेडसावणारी समस्या आहे. कोणतीही पूर्वसूचना न मिळता एकाएकी येणारा हा झटका काही

Avoiding death due to cardiovascular disease | हृदयरोगामुळे होणारा मृत्यू टाळणे शक्य

हृदयरोगामुळे होणारा मृत्यू टाळणे शक्य

Next

हृदयरोगामुळे अचानक येणारा मृत्यू ही आताच्या काळात सर्वात प्रकर्षाने भेडसावणारी समस्या आहे. कोणतीही पूर्वसूचना न मिळता एकाएकी येणारा हा झटका काही मिनिटांत माणसाचे आयुष्यच संपवून टाकतो. अशा वेळी आजूबाजूचे सगळे जणच गडबडून जातात आणि नेमके काय करावे, हे कोणालाच सुचत नाही. या अतिशय कमी कालावधीत त्या व्यक्तीला मात्र प्राण गमवावे लागतात. परंतु या सुरुवातीच्या ५ मिनिटांतच काही महत्त्वाचे उपाय केल्यास हृदयरोगाचा झटका आलेल्या रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता जास्त असते.
अतिशय आरोग्यपूर्ण दिसत असलेल्या व्यक्तींना आपल्याला अशा प्रकारे हृदयरोगाचा झटका येऊच शकत नाही, असे वाटत असते. मात्र, हा झटका येण्यास कोणतेही एक ठोस असे कारण सांगता येत नाही. त्यामागे विविध कारणे असू शकतात. त्यामुळे आपण धडधाकट आहोत आणि आपल्याला एकाएकी हृदयरोगाचा झटका येणे शक्य नाही, अशा भ्रमात कोणीही राहू नये.
अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी नागरिकांनी या उपचारांचे योग्य ते प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक असते. हा हृदयरोगाचा झटका कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी येऊ शकतो. बाजारपेठ, मॉल, बाग, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अशा प्रकारे कोणत्या व्यक्तीला झटका आल्यास त्याला सावरणे आणि त्याच्यावर उपचार करणे आजूबाजूच्यांसाठी मोठे जिकिरीचे होऊ शकते.
सुरुवातीच्या काळातच काय करायचे हे माहीत नसल्याने त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची घाई केली जाते. परंतु त्यादरम्यान गेलेला वेळच अतिशय महत्त्वाचा असल्याने त्या रुग्णाचा मृत्यू होण्याचीच शक्यता जास्त असते.
यामध्ये रुग्णाच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्याने ही परिस्थिती उद्भवू शकते. हे नुकसान कधीच भरून येणारे नसते. याचे कारण बऱ्याच वेळा हृदय सुरू करण्यात डॉक्टर्स यशस्वी होतातसुद्धा; पण मेंदूला काही काळ रक्तपुरवठा न झाल्याने रुग्ण कित्येक आठवडे, महिने किंवा वर्षे कोमात राहू शकतो.
हृदयविकाराचा झटका आल्यास काही उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते; परंतु मेंदू रक्तपुरवठ्याअभावी निकामी झाल्यास, त्यावर उपाय करणे अनेकदा डॉक्टरांच्याही हाताबाहेर असते. मेंदूचा रक्तपुरवठा चालू ठेवण्यासाठी काही प्रथमोपचार गरजेचे असतात; मात्र त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. अशा वेळी आपण काहीच करू शकत नसल्याने रुग्णाला गमावतो. त्यामुळे त्या एका व्यक्तीबरोबरच त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते.
अचानकपणे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण ४० ते ६० या वयोगटात जास्त असते. साधारण २५ ते ४० या वयात करिअर आणि धावपळ यांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. धकाधकीची, स्पर्धात्मक जीवनशैली, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचे सेवन व तंबाखू आणि मद्याची साथ यांमुळे हृदयविकाराचा झटका कमी वयातही येऊ शकतो.
- डॉ. सुहास हरदास
(लेखक हृदयरोगतज्ज्ञ आहेत.)
शब्दांकन - सायली जोशी
-------
हृदयविकाराचा झटका येणे आणि हृदय बंद पडणे या दोन वेगळ्या गोष्टी असून, त्यांचे वेळीच निदान होणे गरजेचे असते. हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद पडणे म्हणजे हृदयविकाराचा झटका येणे. अशा प्रकारे आलेल्या झटक्याने हृदय बंद पडू शकते. त्यामुळे नेमके हृदय बंद पडले आहे की झटका आला आहे, याचे निदान पहिल्या १० सेकंदांत होणे गरजेचे असते.
---------
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. हृदयामध्ये बसविला जाणाऱ्या ‘स्टेंट’ हा प्रकार आतापर्यंत धातूरूपात वापरला जायचा. यामध्ये आता विरघळणारे स्टेंटही उपलब्ध आहेत. त्याची किंमत काही प्रमाणात जास्त असली, तरीही हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांसाठी हे स्टेंट अतिशय उपयुक्त आहेत. या स्टेंटमुळे वासोमोटोर रक्तवाहिनी लवचीक राहते. यासाठी रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्या कमी कालावधीसाठी द्याव्या लागतात. याचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे भविष्यात त्या रुग्णाची बायपास शस्त्रक्रिया करावी लागल्यास नवीन रक्तवाहिनी जोडणे सुलभ जाते.
----------
त्यामुळे काही ठरावीक काळाने उद्भवणारा त्रासही वाचतो. ‘वासोमोटोर टोन’ हे या नवीन तंत्रज्ञानाचे नाव असून, त्याद्वारे रक्तवाहिन्यांवर येणारा ताण नियंत्रणात ठेवला जातो.
---------------
या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी
व्यक्ती खाली कोसळली की सगळ्यात पहिल्यांदा तिचे हृदय चालू आहे की बंद हे जाणून घ्यावे.
अशा प्रकारे व्यक्ती खाली कोसळण्यामध्ये रक्तातील साखर कमी होणे, मेंदूचा स्ट्रोक, एपिलेप्सी यांसारखी इतरही कारणे असू शकतात.
हृदय थांबले असल्यास
व्यक्ती खाली कोसळल्यावर हृदयाचे ठोके सामान्यपणे ऐकू येत नाहीत. अशावेळी नाडी चालू आहे की नाही ते तपासावे.
या वेळी मनगटाची नाडी न तपासता गळ्याच्या ठिकाणी असणारी (कॅरोटाइड) नाडी तपासावी. ही नाडी कशी, कुठे, किती वेळासाठी पाहायची याचेही शास्त्रीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

Web Title: Avoiding death due to cardiovascular disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.