जरांगे यांच्या विरोधामुळे माझ्या उमेदवारीला टाळाटाळ : भुजबळ
By संजय पाठक | Published: May 25, 2024 01:28 PM2024-05-25T13:28:28+5:302024-05-25T13:28:54+5:30
मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषित झाली नाही, अन्यथा जिंकण्याची रणनीती तयार होती, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो; मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनीच उमेदवारी करण्यासंदर्भात महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितले. त्यानंतर उमेदवारी घोषित होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही. खरे तर शाह यांच्या निर्णयाला विरोध करण्याचे कारण नव्हते. मात्र, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी त्यास विरोध केला असावा, मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषित झाली नाही, अन्यथा जिंकण्याची रणनीती तयार होती, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मी नाराज नव्हतोच....
मला उमेदवारी देऊ नका आणि दिली तर नंतर घोळ घालू नका, असे मी अगोदरच सांगितले होते. कारण नंतर ओबीसी समाज नाराज होईल, झालंही तसेच! त्यामुळे एक प्रकारच्या अपमानाची भावना निर्माण झाली. अर्थात, मी नाराज नव्हतोच, नाशिक येथे बसूनच सूत्र हलवत हाेतो, असे भुजबळ यांनी सांगितले.