‘एव्हॉन’... नोंदी नाहीत... सारेच संशयास्पद !
By admin | Published: June 21, 2016 04:03 AM2016-06-21T04:03:56+5:302016-06-21T04:03:56+5:30
देश परदेशात गाजत असलेल्या इफेड्रीन प्रकरणाचे मूळ केंद्र ठरलेल्या सोलापुरातील एव्हॉन कंपनीतील कामगारांसह संबंधितांची ठाणे पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली
विलास जळकोटकर / अमित सोमवंशी, सोलापूर
देश परदेशात गाजत असलेल्या इफेड्रीन प्रकरणाचे मूळ केंद्र ठरलेल्या सोलापुरातील एव्हॉन कंपनीतील कामगारांसह संबंधितांची ठाणे पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली. कंपनी बंद असतानाही इफेड्रीनचा साठा बेकायदेशीपणे बाहेर काढून त्याच्या कोठीही नोंदी केल्या नाहीत. ज्यांनी ही बाब निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला त्यांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक माहिती ठाणे पोलिसांच्या चौकशीतून समोर येऊ लागली आहे.
या प्रकरणाची तपास अधिकारी ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके रविवारी सोलापुरात आले होते. रात्री उशिरापर्यंत ते एव्हान कंपनीमध्ये ठाण मांडून होते. दिवसभरात त्यांनी कंपनीच्या कामगारांशी, युनियन लिडर यांच्याशीही संवाद साधला. कंपनी बंद काळातही इफेड्रीनचा साठा बाहेर नेण्यात आला मात्र त्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याने हा साराच प्रकार संशयास्पद असल्याचे या चौकशीवरुन स्पष्ट होत असल्याचे शेळके यांनी सांगितले.
चिंचोळी एम. आय. डी. सी. परिसरातील ३२ एकर क्षेत्रावर कार्यरत असलेल्या एव्हान कंपनीने मोठी विस्तारीत जागा असतानाही कंपनीपासून एक कि. मी. अंतरावर माल ठेवण्यासाठी भाडेतत्वावर गोडावून घेतले होते. कंपनीमध्ये काय चालते याबद्दल कामागरवर्गासह सर्वच कर्मचारी अनभिज्ञ होते मात्र जेव्हा रातोरात इफेड्रीनच्या निमित्ताने कंपनी चर्चेत आली तेव्हा कामगारांकडून अनेक बेकायदेशीर बाबींची माहिती ठाणे पोलिसांच्या पथकापुढे येऊ लागली आहे.
दोन वेळा इफेड्रीनची चोरी
२०१४ व २०१५ या वर्षात एव्हॉन कंपनीतून दोनवेळा इफेड्रीनची मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती. ही बाब कामगारांनी कंपनी व्यवस्थापनास सांगितली असता कंपनीने यासंबंधी तक्रार दाखल केली नाही. तर दुसरीकडे इफेड्रीनची चोरी कंपनीतील काही मंडळी करीत असल्याचे कामगारांनी नाव सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.
मुंबईच्या दारु कंपनीला
विकले अल्कोहोल
इफेड्रीनच्या रॉ मटेरियलचा आधार घेऊन तस्करी केलेल्या पुनित श्रृंगी याने अल्कोहोल टँकरवर डल्ला मारला आहे. काही महिन्यांपूर्वी एव्हॉन कंपनीतून एक टँकर भरुन अल्कोहोल मुंबईच्या एका दारु बनवणाऱ्या कंपनीस विकल्याची माहितीही पुढे आली आहे. यातील गौडबंगाल पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.