अवघा मराठा एक जाहला!

By admin | Published: September 26, 2016 01:27 AM2016-09-26T01:27:06+5:302016-09-26T01:27:06+5:30

शेतकरी होरपळून निघतो आहे. बी-बियाणे, खते नाहीत, निसर्गाची साथ नाही, बाजारभाव मिळत नाही. शेतकरी पाण्यावाचून तडफडतोय आणि आरक्षण पोराला शिकू देत नाही.

Awaha Maratha is a jahla! | अवघा मराठा एक जाहला!

अवघा मराठा एक जाहला!

Next

पुणे : शेतकरी होरपळून निघतो आहे. बी-बियाणे, खते नाहीत, निसर्गाची साथ नाही, बाजारभाव मिळत नाही. शेतकरी पाण्यावाचून तडफडतोय आणि आरक्षण पोराला शिकू देत नाही. आत्महत्या करणारा ९० टक्के शेतकरी मराठा आहे. आम्हांला आमच्या वाट्याची भाकरी हवी आहे. मराठ्यांचा हा आक्रोश आता दिल्लीलाही हलविल्याशिवाय राहणार नाही, असा एल्गार मराठा क्रांती मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या तरुणींनी व्यक्त केला. शेतकऱ्यांची होरपळ, आरक्षणाअभावी पीछेहाट, सरकारची अनास्था आदी प्रश्नांची आक्रमक, मुद्देसूद आणि काळजाला हात घालणाऱ्या तरुणींच्या भाषणांनी उपस्थितीतांच्या अंगावर काटा उभा राहिला.

डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेला मराठा क्रांती मोर्चा दुपारी सव्वाबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विधान भवनाच्या प्रवेशद्वारासमोर एका ट्रकवर मंडप घालून विचारमंच उभारण्यात आला होता. या मंचावर मोहिनी पलांडे, शुभदा येवले, अर्चना भोर, सुचेता भालेराव, श्रद्धा पलांडे, सारिका भोसले या ६ तरुणी उपस्थित होत्या. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रतीक्षा गव्हाणे हिने मागण्यांचे निवेदन वाचून दाखविले. त्यानंतर मोहिनी पलांडे या युवतीने तिच्या धीरगंभीर आवाजामध्ये समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने आपले मनोगत मांडण्यास सुरूवात केली.

मोहिनी पलांडे म्हणाली, की शेतकऱ्यांची मुलगी म्हणून मी बोलत आहे. शेतकरी होरपळून निघतो आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, खते आणि बी-बियाणे नाही, निसर्गाची साथ नाही. बाजारभाव मिळण्याची सोय नाही. सध्या ५ पैशांचे नाणे पाहायला मिळत नाही, मात्र आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याला ५ पैसे दराने भाव मिळतो आहे. व्यापारी आणि ग्राहक भाव ठरवितो आहे हे थांबले पाहिजे. सरकार ३५ हजार कोटींचा अर्थसंकल्प तयार करतेय. मात्र शेतकऱ्यांसमोर जगायचे कसे, मुलींची लगे्न कशी करायची, आई-वडिलांच्या आजारपणाचा खर्च कुठून करायचा, मुलांच्या शिक्षणाचे काय असे असंख्य प्रश्न उभे आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी ठाम मागणी मोहिनी पलांडे हिने केली.

सुचेता भालेराव म्हणाली, की मराठा आता जागा झाला आहे, कोपर्डीच्या निमित्ताने तो ज्वालाग्राही म्हणून बाहेर आला आहे. भगव्या झेंड्याचा आक्रोश होतोय. मराठ्याविना राष्ट्रगाडा चालणार नाही.’’ सारिका भोसले हिने जिजाऊ वंदना सादर केली. त्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.

घटनेतील सामाजिक न्याय व समान संधी कुठयं?
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्व भारतीयांना सामाजिक व आर्थिक न्याय दिला जाईल. सर्वांना सर्वच क्षेत्रांत समान संधी उपलब्ध असतील, असे नमूद करण्यात आले आहे. घटनेतील सामाजिक व आर्थिक न्याय व समान संधीचा निकष मराठ्यांसाठी का नाकारला जातोय, असा सवाल या या वेळी उपस्थित करण्यात आला.


विचारमंचावर जिजाऊ, शिवाजी, शाहू, अण्णासाहेब
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर एका ट्रकवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विचारमंच उभारण्यात आला होता. कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती (मूक) मोर्चा असे फलक विचारमंचाच्या चारी बाजूने लावण्यात आले होते. या सर्व फलकांवर राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू, माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांचे छायाचित्र होते. विचारमंचावर जिजाऊ यांची प्रतिमा व शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता.

इतिहासातील पहिलाच उच्चांकी मोर्चा
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही पुणे हे देशाच्या सामाजिक, राजकीय घडामोडींचे एक प्रमुख केंद्र राहत आले आहे़ पुण्यात इतकी प्रचंड गर्दी असलेला मोर्चा यापूर्वी कधीच झाला नव्हता. मराठा क्रांती मूक मोर्चा हा पुण्यातील रेकॉर्डब्रेक नव्हे, तर पुण्याच्या इतिहासातील पहिलाच व सर्वांत उच्चांकी मोर्चा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी पुण्यात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चातील अत्यंत शिस्तबद्ध व सुनियोजनामुळे अन्य समाजाबांधवांमध्ये मोर्चाचा नवा पायंडा प्रस्थापित केला आहे.
पुण्यामध्ये गणेशोत्सव आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला लाखोच्या संख्येने संख्येने भाविक एकत्र येतात.

पुण्यात विधान भवन, जिल्हाधिकारी कार्यालयावर नेहमीच विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या समाजाचे, शेतकरी, सरकारी कर्मचारी यांचे मोर्चे निघत असतात. या मोर्चांमध्ये सहभागी झालेल्या लोकांची संख्या मर्यादित असतात. पुण्यातील सर्वाधिक उच्चांकी मोर्चा व पहिलाच मोर्चा म्हणून भविष्यात मराठा मोर्चाकडे पाहिले जाईल.
पुणे शहराला मोर्चांचा नसला तरी रेकॉर्ड ब्रेक सभांचा मोठा इतिहास आहे. यामध्ये बांगलादेशाच्या निर्मितीत १९७१ मध्ये भारताच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी अत्यंत करारी भूमिका घेतली होती. या निर्णयानंतर इंदिरा गांधी यांच्या पुण्यात झालेल्या सभेला प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा १९७६ मध्ये सारसबागेत घेतलेल्या सभेला अशीच प्रचंड गर्दी झाली होती.

या सभेच्या गर्दीचा त्या वेळी पुण्यासह लगतच्या अनेक जिल्ह्यामधील लोकांमध्ये व माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या १९७५ मध्ये स.प. महाविद्यालयांच्या मैदानावर झालेल्या सभेला, १९७७ मध्ये इंदिरा गांधीचा पराभव करणाऱ्या राजनारायण यांच्या सभेलादेखील लाखोंची गर्दी झाली होती.

सूचनांचे पालन
हा मूक मोर्चा असल्याने घोषणाबाजीच काय मोर्चामध्ये एकमेकांशी बोलायचे नाही अशा सक्त सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या, त्यांचे तंतोतंत पालन महिला करताना दिसत होत्या अगदी महिला स्वयंसेवकांपासून मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तरूणीही शेवटपर्यंत ‘मौन’ बाळगून होत्या. शांत आणि संयमीपणे महिलांनी मोर्चाचे प्रतिनिधित्व केले.

हजारो मोर्चास मुकले
शहरातील विविध भागांमधून मोर्चेकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सर्व रस्ते फुल्ल झाल्याने पुढे जायला मार्गच उरला नव्हता. त्यामुळे मोर्चामध्ये जाऊ न शकलेल्या हजारो लोकांची अलका चौकात गर्दी झाली होती. बाहेरगावहून आलेले लोक मोर्चास मुकले.

प्रमुख रस्त्यांवर जनसागर
शहरातील आतापर्यंतच्या सर्व मोर्चांचे व गर्दीचे विक्रम मोडीत काढत मराठा क्रांती मूक मोर्चाने एकजुटीचा नवा इतिहास रचला. रविवारी लक्ष्मी रस्त्यासह लगतच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मराठा बांधवांचा जनसागर उसळला. एरवी केवळ गणेशोत्सवात गर्दीने फुलून जाणाऱ्या शहरातील रस्त्यांवर लाखो मराठा बांधवांचा नि:शब्द हुंकार उमटला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा खंडोजीबाबा चौकातून लक्ष्मी रस्त्याने पुढे विधान भवनावर धडकणार होता. त्यानुसार संपूर्ण नियोजनही करण्यात आले होते. पण रविवारी मराठा बांधवांचा शहरात अक्षरश: जनसागर उसळला. त्यामुळे मोर्चासाठी लक्ष्मी रस्ता अपुरा पडला. सर्व पर्यायी रस्त्यांनी मराठा बांधवांनी विधान भवनाकडे कूच केले. परिणामी शहरातील सर्वच रस्ते मराठा जनांच्या प्रवाहाने फुलून गेले होते. मोर्चाची वेळ रविवारी सकाळची असली तरी आदल्या दिवशी सायंकाळपासूनच पुणे जिल्ह्यासह विविध भागांतून मराठा बांधव शहरात दाखल होत होते. रविवारी पहाटेपासून सोलापूर, सातारा, सासवड, नाशिक, नगर, पुणे-मुंबई या सर्व महामार्गांवरून भगवे ध्वज, एक मराठा लाख मराठा असे स्टीकर लावलेले वाहनांचे जथ्थे शहरात येण्यास सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सुविधा करण्यात आली होती. तेथे वाहने पार्किंग करून मोर्चेकरी लक्ष्मी रस्त्यावर आले.
पोलिसांनी पहाटेपासूनच विविध प्रमुख रस्त्यांनी येणारी जड वाहतूक बंद केली होती. बघता बघता शहराच्या मध्यभागात येणारे सर्वच रस्ते मराठा बांधवांनी भरून गेले. मोर्चाच्या या प्रमुख मार्गाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. तसेच कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता तसेच पुणे स्टेशन परिसरातील सर्व रस्त्यांवरून मराठा जनांचा प्रवाह मोर्चाच्या दिशेने चालत होता. मोर्चा विधान भवनावर पोहोचला तरी या रस्त्यांवर तितकीच गर्दी दिसत होती.

गळफास घेतलेला शेतकरी लक्षवेधी
पाऊस आहे तर बियाणे नाही, बियाणे आहे तर पाऊस नाही, पीक आहे तर हमीभाव नाही, अशा अनेक संकटांनी शेतकरी कायम घेरलेला असतो. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांना रोजचे जगणे म्हणजे रोजचे मरणेच असते. नेमकी हीच समस्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मराठा तरुणाने गळफास घेतल्याची वेषभूषा केली होती. टिळक चौकामध्ये उभा असलेला हा तरुण सर्वांचे लक्ष वेधत होता.
धोतर, बंडी आणि मुंडासे अशा पेहरावातील तरुण शेतकऱ्याच्या गळ्यात फास असून, हा फास सरकारने आवळल्याचे दृष्य उभे करण्यात आले होते. अनेक तरुण आणि मोर्चेकरी थांबून त्याचे मोबाईलमध्ये फोटो घेत होते. साध्या पेहरावामधून या तरुणाने गंभीर विषय समाजासमोर ठेवला होता.

आम्हालाही हवी समान संधी़़़!
शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यातच दुष्काळी परिस्थिती, सावकाराच्या त्रासामुळे मराठा समाजातील बहुतांश कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे मराठा समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यातून समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर समाजाप्रमाणे मराठा समाजालाही समान संधी मिळायला हवी; त्यासाठी मराठा समाजास स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची गरज आहे, अशा भावना पुण्यातील मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांनी रविवारी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध शहरांत मराठा समाजाकडून मूक मोर्चा काढला जात आहे. मोर्चात पुरुष, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह तरुण-तरुणी लाखोंच्या संख्येने सहभाग घेत
आहे. शिक्षणाचा खर्च वाढला असून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लाखो रुपये शुल्क देणे शक्य होत
नाही. परिणामी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड
झाले आहे.
एकसारखे गुण मिळालेले असताना इतर समाजातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. आरक्षण मिळत असल्याने कमी शुल्क प्रवेश मिळतो. मात्र, त्याच अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी लाखो रुपये शुल्क का भरावे, असा सवाल मोर्चातील तरुणांनी उपस्थित केला.

Web Title: Awaha Maratha is a jahla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.