को जागर्ति?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 01:48 AM2016-10-16T01:48:42+5:302016-10-16T01:48:42+5:30

अ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारी महिन्यात संमेलन डोंबिवलीत होत आहे. अध्यक्षपदासाठीही चुरस आहेच.

Awakening to? | को जागर्ति?

को जागर्ति?

Next

- रविप्रकाश कुलकर्णी

अ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारी महिन्यात संमेलन डोंबिवलीत होत आहे. अध्यक्षपदासाठीही चुरस आहेच.

सृष्टीचक्र अविरत फिरत असते. सुष्ट आणि दुष्ट ही लढाई विषम आहे; पण याचा अर्थ दुष्टांचा नि:पात होणारच नाही असं नाही. ती उमेद कायम टिकवण्यासाठी सण-उत्सवांची निर्मिती झाली आहे. शेवटी हजार वर्षांचा काळोखदेखील एका काडीच्या प्रकाशाने नष्ट होतो. या काडीचं भान ठेवणं यासाठीच म्हणायचं, ‘को जागर्ति?’ याचा अर्थ ‘कोण जागं आहे?’ आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे हे लक्ष्मी पाहत असते. ते काय फक्त कोजागरीपुरतंच आहे?
धर्म, जाती-जमाती-उपजाती यांचं प्रस्थ कमी कमी होत गेलं पाहिजे असं वाटत असतानाच वारे उलटेच वाहत आहेत असं वाटण्यासारखी परिस्थिती झाली आहे. साहेबराव ठाणगे यांनी म्हटलंय,
पाऊस असा कोसळावा
धर्म जाती जाव्यात बुडून
पाऊस असा गडगडावा
मधल्या भिंती जाव्यात पडून
एका कवीचं हे आकं्रदन कुणाच्या कानावर जाणार आहे की नाही?
म्हणून मग म्हणावंसं वाटतं, को जागर्ति?
अ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात संमेलन डोंबिवली येथे होत आहे. या वेळी सात-आठ ठिकाणांहून आपल्या गावी संमेलन व्हावं अशी मागणी आली होती. डोंबिवलीकरांनी आपल्या गावी हे संमेलन व्हावे म्हणून आठ वर्षे पाठपुरावा केला होता. आता इतर जण असा पाठपुरावा करतील काय? त्यांच्या या संमेलन प्रेमाला दाद द्यायलाच हवी. पण क्षणभर त्यांनी असा विचार करावा की, त्यांच्याकडे साहित्य संमेलन झालं असतं तर त्यांची कशी तयारी केली असती? त्यांचा ब्ल्यू प्रिंट त्यांनी तयार करायला काय हरकत आहे? त्या दृष्टीकोनातून ते डोंबिवली संमेलन आयोजकांना सूचना करू शकतील का?
मागे बहुधा कौतिकराव ढाले पाटील हे जाहीरपणे म्हणाले होते की, साहित्य संमेलनाचं संमेलनाध्यक्षपद हवं आहे तर आम्हाला भेटा. ही कार्यप्रणाली त्यांनी एकदा जाहीरच करून टाकावी की, म्हणजे एकदाच हे अ.भा. अध्यक्षपद काय आहे याचे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल... पण हे व्हायला कोणाला हवं का?
म्हणून म्हणतो, को जागर्ति?
आता साहित्य संमेलन म्हटलं की संमेलनाध्यक्ष आलाच, त्याची साठमारी आता सुरू होईलच. आता निवडणूक म्हटलं की ते अपरिहार्यच... पण, साहित्य संमेलनाध्यक्ष तरी कशाला व्हायचं? जयवंत दळवी म्हणत की, मला काही खरोखरच सांगायचं असेल तर मी लेख लिहीन, पुस्तक लिहीन! त्यासाठी संमेलनाध्यक्षच व्हायला पाहिजे असं थोडंच आहे? पण जयवंत दळवींना असल्या गोष्टींचा सोसच नव्हता. त्यांचं जाऊ दे, पण ज्यांना मान हवा आहे, कौतुक करून घ्यायचं आहे, मिरवायचं पण आहे त्यांना शौक करू देत. पण संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर उगाच कुठली भूमिका घेण्यात काय अर्थ आहे. यावरून आठवलं, संमेलनाध्यक्षपद संमेलनाला नसलं तरी कुणाचं काहीही अडत नाही. जसं व्हायचं तसं संमेलन होतं हे आपण पाहिलं आहे. कुणी सांगावं उद्या एखादा संमेलनाध्यक्ष भाषण हवंच कशाला? असं म्हणेलदेखील. संमेलनाने असे अनेक प्रश्न आजतागायत मांडले आहेत. त्यांचं काय करायचं? त्यांचं काय झालं. त्या अर्थानं मग म्हणायचं, ‘को जागर्ति?’
हे सगळं पाहता मग मराठी भाषा मरू घातली आहे, असं कुणी म्हणतात त्याचं काय? पुस्तक कोणी वाचत नाही असा वर्षानुवर्षे गळा काढला जातो आहे. पण, इकडे पाहावं तर प्रकाशकांची जशी संख्या वाढते आहे त्याचप्रमाणे साहित्य संमेलनात विक्रमी संख्येने पुस्तकं विकली जातात असं दर साहित्य संमेलनात सांगितलं जातंय. मग हा तिढा कसा सोडवायचा?
अशा वेळी प्रश्न येतोच, ‘को जागर्ति?’
संमेलनाच्या निमित्ताने का होईना चार ठिकाणची चार लोकं येतात. साहित्याच्या वातावरणात कमी-जास्त राहतात. हे चांगलंच आहे. पण हे वातावरण थोडंसं तरी टिकण्यासाठी स्थानिक संमेलन आयोजक काही करतात का? करू शकतात का? संमेलनाचा खर्च आता ४-५ कोटींच्या घरात जायला लागला आहे. दरवर्षी तो वाढतोच आहे. हे पैसे उभारताना आयोजकांना काय काय यातायात करावी लागते हे त्यांचं त्यांनाच ठाऊक, पण प्रत्यक्षात साहित्यासाठी, वाङ्मयीन वातावरण उभारण्यासाठी, टिकविण्यासाठी असं म्हणता येईल. अशा उपक्रमांना कितीसा पैसा जातो? संमेलन मंडप आणि जेवणावळी हाच सर्वांत मोठा खर्च होतो? म्हणूनच काही म्हणतात, साहित्य रसिकांची बडदास्त उत्तम ठेवा म्हणजे जेवण उत्तम द्या. राहायची व्यवस्था चोख करा. म्हणजे संमेलन झालं यशस्वी. याचं उत्तर काय आहे? म्हणून म्हणतो, ‘को जागर्ति?’ हे सगळं का सांगतो आहे ते सांगतो. काल कोजागरी होती. परंपरेनं आलेल्या गोष्टी सांगून झाल्या.
आटीव दूध पिणं झालं. जागरणपण केलं. पण नातवानं प्रश्न केला, टी.व्ही. सिरीयल पाहता पाहता आता जागरण होतंच ना? तरी का म्हणायचं, ‘को जागर्ति?’ त्याची समजूत कशीबशी मी घातली. पण खरंच ‘को जागर्ति?’ काय फक्त कोजागरीलाच?

Web Title: Awakening to?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.