बारामतीत शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ
By Admin | Published: June 7, 2017 01:31 AM2017-06-07T01:31:23+5:302017-06-07T01:31:23+5:30
बारामती प्रांत कार्यालयासमोर जागरण गोंधळ करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी शेतकरी क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती प्रांत कार्यालयासमोर जागरण गोंधळ करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीसाठी साकडे घातले. तसेच, आंदोलकांनी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय यासह इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये असलेल्या मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संंपानंतर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरात भाज्यांचे दर तिपटीने वाढले आहेत. बारामती शहर, तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी शहर आणि तालुक्यात पुकारलेल्या कडकडीत बंदनंतर सोमवारी (दि.६) शेतकरी क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती शहरातील शासकीय मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीसमोर जागरण गोंधळ घालण्यात आला. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेले हे आंदोलन बारामतीकरांच्या चर्चेचा विषय ठरले. सुरुवातीला मध्यवर्ती कार्यालय इमारतीला टाळे ठोकून सदर आंदोलन सुरू केले. या वेळी आंदोलकांनी जागरणातील गोंधळी गीतांच्या माध्यमातून सरकारकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. हातात संंबळ, तुणतुणे आदी वाद्यांच्या गजरात गोंधळींच्या वेषात या वेळी लोटांगण घालण्यात आले. मळवट भरून सहभागी झालेले आंदोलकांमुळे प्रत्यक्षात जागरण गोंधळ नागरिकांनी अनुभवले.
आंदोलकांनी दगडाला मळवट भरून मुख्यमंत्री बनवून या दगडापुढे सवाद्य गोंधळ घातला. काही आंदोलकांनी अंगात देव आल्याचे नाट्य रंगविले.
पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे, संभाजी होळकर, अॅड. सचिन वाघ, जितेंद्र काटे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलकांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना नोटिसा देऊन सोडून देण्यात आले.
>शासकीय कार्यालयांना टाळे : व्यवहार बंद
पुणे : मंगळवारी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शासकीय कार्यालयांकडे वळविला. ठिकठिकाणी कार्यालयांना प्रतीकात्मक स्वरूपात टाळे ठोकण्यात आले. काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. आजही बहुतांश ठिकाणी आठवडेबाजार बंद ठेवण्यात आले होते. तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार आजही बंद होते.
घोडेगाव येथे शेतकरी कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयाला प्रतीकात्मक टाळेठोक आंदोलन झाले. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. सासवड नगरपालिका व पंचायत समितीला शेतकऱ्यांनी मंगळवारी टाळे लावले.
वाघोली येथील आठवडेबाजार सकाळी भरलाच नाही. भोर शहरात शेतकरी व व्यापारी माल घेऊन न आल्याने ग्राहकांना परत जावे लागले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती आजही पूर्णपणे बंद होती.