रौप्य महोत्सवात पुरस्कारांचा चौकार

By admin | Published: May 5, 2017 06:25 AM2017-05-05T06:25:12+5:302017-05-05T06:25:12+5:30

स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ४४ शहरांनी सहभाग घेतला होता. यापैकी नवी मुंबईला देशातील ८ व्या

Awards of silver at the silver festival | रौप्य महोत्सवात पुरस्कारांचा चौकार

रौप्य महोत्सवात पुरस्कारांचा चौकार

Next

नामदेव मोरे / नवी मुंबई
स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ४४ शहरांनी सहभाग घेतला होता. यापैकी नवी मुंबईला देशातील ८ व्या क्रमांकाचे स्वच्छ शहर असल्याचा बहुमान मिळाला. पहिल्या दहामध्ये सहभाग असलेले एकमेव शहर ठरले आहे. घनकचरा व्यवस्थापनाची सर्वात उत्तम यंत्रणा, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, कचरा उचलण्याचे योग्य नियोजन व कचऱ्यावर होणारी प्रक्रिया यामुळे २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये राज्य शासनाचे तीन पुरस्कार पालिकेने मिळविले असून, येथील स्वच्छतेवर आता थेट केंद्र शासनाची मोहर उमटली आहे.
नवी मुंबईच्या शेजारी असणाऱ्या मुंबई, ठाणे, मीरा-भार्इंदर, कल्याण- डोंबिवली, पनवेल महापालिकांना घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात अपयश आले आहे. डंपिंग ग्राउंडसह वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने वारंवार आंदोलने केली जात आहेत. डंपिंग ग्राउंडमुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना नवी मुंबई महापालिकेमध्ये अद्याप कचरा उचलण्यावरून व कचऱ्याची विल्हेवाट करण्यावरून आंदोलन करण्याची वेळ आलेली नाही. महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने अत्याधुनिक डंपिंग ग्राउंड उभारण्यावर लक्ष केंद्रित केले. कोपरखैरणेमधील डंपिंग ग्राउंड बंद केल्यानंतर तेथे भव्य निसर्ग उद्यान उभारले आहे. यानंतर तुर्भेमध्ये डंपिंग ग्राउंड तयार केले असून सद्यस्थितीमध्ये देशातील सर्वात अत्याधुनिक डंपिंग ग्राउंड म्हणून त्याची ओळख आहे. देश-विदेशातील शिष्टमंडळ डंपिंग ग्राउंडची पाहणी करण्यासाठी शहरामध्ये येत आहेत. शहरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचा प्रयोग फसल्यानंतर महापालिकेने योग्य नियोजन केले असून सद्यस्थितीमध्ये शहरातील कचरा वेळेवर उचलला जात आहे. मुंबईसह ठाणे व इतर शहरांमध्ये सांडपाणी खाडीमध्ये सोडले जात आहे. फक्त नवी मुंबईमध्ये १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून त्यासाठी अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत.
नवी मुंबई हे राज्यातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. राज्य शासनाने २००२ मध्ये सर्वप्रथम संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविले. हे अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे पहिल्याच वर्षी महापालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. २००५ - ०६ या वर्षामध्ये महापालिकेने पुन्हा नागरी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला. या अभियानामध्येही प्रथम क्रमांक मिळविला, याशिवाय २००८ - ०९ या वर्षामध्येही विशेष पुरस्कार मिळविला. या तीनही अभियानामध्ये पालिकेने १ कोटी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळविले. या बक्षिसामधून पालिकेने नेरूळमध्ये संत गाडगे महाराज उद्यान उभारले असून वंडर्स पार्कनंतर ते नवी मुंबईतील सर्वात प्रमुख उद्यान आहे. केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्येही देशातील ८ वा व राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवून पुन्हा एकदा नवी मुंबईत राज्यातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबईला मिळालेले हे मानांकन खरोखरच कौतुकास्पद आहे. आता ही जबाबदारी संपलेली नसून हे मानांकन टिकवणे तसेच आणखी अव्वल स्थान गाठण्याचा ध्यास घेणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासून स्वच्छतेचे मूल्य रुजविणे आवश्यक असून नागरिक, प्रशासकीय व्यवस्थेने मिळून स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
- डॉ. सुभाष बोरसे,
बोर्डाचे सहसचिव


एक नवी मुंबईकर असल्याचा खूप अभिमान वाटतोय. प्रत्येक परिसरातील नागरिकाने स्वच्छतेची शपथ घेऊन शहर स्वच्छ कसे राखता येईल यादृष्टीने प्रयत्नशील राहिले पाहिजे. घराप्रमाणेच आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नवी मुंबई शहराची प्रगती झपाट्याने होत असली तरी सामाजिक मूल्यांचा विसर पडता कामा नये.
- शीतल पाठक,
अभिनेत्री


स्वच्छ भारत अभियानातंर्गत नवी मुंबई शहराला मिळालेले मानांकन ही नवी मुंबईकरांसाठी गर्वाची गोष्ट आहे. शहरातील बस डेपो, रेल्वे स्थानक तसेच महत्त्वाच्या परिसरात नागरिकांनी तसेच प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवित जनजागृतीपर उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनही अचूक पध्दतीने होणे आवश्यक आहे.
- डॉ. विलासराव कदम, संचालक,
भारती विद्यापीठ, नवी मुंबई


महापालिकेने केलेले काम
अभियान काळात शहरात ६९ ठिकाणी सामुदायिक शौचालयांची उभारणी
पामबीचसह ठाणे-बेलापूर रोडवर २० ई-टॉयलेटची उभारणी
महिलांसाठी अत्यावश्यक त्या ठिकाणी ६ स्मार्ट एसएचई शौचालयांची उभारणी
अभियानादरम्यान झोपडपट्टीमध्ये वैयक्तिक शौचालयांची उभारणी
गणेशोत्सव काळात ६५ टन निर्माल्य संकलित करून खतनिर्मिती
२०१६ - १७ मध्ये १७० ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता मोहीम
प्लास्टीकमुक्त नवी मुंबई अभियान
सर्व १११ प्रभाग हागणदारीमुक्त घोषित
शहरातील ११२ गृहनिर्माण संस्थांमध्ये कचऱ्यातून खतनिर्मिती
१३५ मोठ्या हॉटेलना कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास भाग पाडले
१३५०० कचराकुंड्या व ६०० कम्युनिटी बिन्समधून कचरा उचलण्यात आला
कचराकुंडीमुक्त नवी मुुंबई अभियानाअंतर्गत २०० ठिकाणच्या बिन्स बंद करण्यात आल्या.


महापालिकेला मिळालेले पुरस्कार
२००१ : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार
२००२ - 0३ : संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान
२००५ - 0६: संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान
२००८ - 0९ : संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान
२००८ : राष्ट्रीय नागरी जल पुरस्कार
२००९ : २४ तास पाणीपुरवठ्यासाठी नागरी जल पुरस्कार
२०१० : पाणीपुरवठ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार
२०११ : ईपीसी वर्ल्ड अ‍ॅवॉर्ड
२०१५ : ग्रीन बिल्डिंग अ‍ॅवॉर्ड
२००९ : मिनीस्ट्री आॅफ अर्बन डेव्हलपमेंट अप्रीसिएशन अ‍ॅवॉर्ड
२००९ : वसुंधरा पुरस्कार
२०११ : विसीटेक्स ग्रीन अर्बन डेव्हलपमेंट अ‍ॅवॉर्ड
२०१६ : गोल्ड अ‍ॅवॉर्ड
२०१७ : स्वच्छ भारत अभियानामध्ये राज्यात प्रथम व देशात ८ वा क्रमांक

Web Title: Awards of silver at the silver festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.